देश

Mumbai News : कांदिवलीमधील कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावल्याने वाद; पालक संतप्त, शिवसेनेची तक्रार, शाळेबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

मुंबईतील कांदिवली (Kandivali) भागातील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये आज सकाळी प्रार्थनेनंतर अजान (Azan) लावण्यात आली. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काही पालकांनी यावर आक्षेप घेतला. तसंच, शिवसेनेने शाळेविरोधात कांदिवली पोलिसांत तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सोबतच शाळेने अशाप्रकारे लाऊड स्पीकर अजान यापुढे लावू नये असं पत्राद्वारे लेखी स्वरूपात शिवसेनेकडून देण्यात आला आहे. दरम्यान ज्या शिक्षिकेने अजान लावली होती, तिला निलंबित करण्यात आलं आल्याची माहिती शाळेकडून देण्यात आली आहे.

शाळेने काय म्हटलं?
या वादावर आम्ही शाळेची बाजू देखील जाणून घेतली. शाळेच्या म्हणण्यानुसार, “आमच्या शाळेत प्रत्येक धर्माच्या प्रार्थना विद्यार्थ्यांना समजावे म्हणून आम्ही त्या लाऊड स्पीकरवर लावतो. मग त्यामध्ये गायत्री मंत्र असेल, कॅरोल सिंगिंग असेल किंवा मग इतर धर्मियांच्या प्रार्थना असतील त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी हा उपक्रम असतो.
यामध्ये आज लाऊड स्पीकर अजान लावण्यात आली. मात्र पालकांच्या भावना लक्षात घेता आम्ही अजान बंद केली. पालकांचं म्हणणं आम्ही ऐकून घेत आहोत. आता यापुढे अशाप्रकारे आम्ही शाळेत आजान लावणार नाही असं आम्ही सर्वांना आश्वासन देत आहोत.”

शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी
शाळेत जाणीवपूर्वक अजान लावली. अजान लावणारे शिक्षक अल्पसंख्याक आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक त्याचं नाव समोर आणलेलं नाही. संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्ते आणि पालकांनी केली आहे. त्याला समोर आणा, माफी मागायला सांगा आणि असा प्रकार पुन्हा होणार नाही असं आश्वासन द्या, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्या वादानंतर शाळेबाहेर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. खबरदारी म्हणून पोलीसही शाळेत दाखल झाले असून शाळेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. महिला पोलिसांचाही समावेश आहे.

हिंदू शाळेत आजान का? : आमदार योगेश सागर
हा सगळा हिंदूंचा परिसर आहे. इथे अजान लाऊड स्पीकरवर का लावण्यात आली? आज शुक्रवार आहे त्यामुळे शाळेमध्ये अजान लावली का? हे काम कोणी केलं आहे? हा उपक्रम कशासाठी? हिंदू शाळेत आजान का लावण्यात आली? असे प्रश्न भाजप आमदार योगेश सागर यांनी उपस्थित केले. तसंच ज्यांनी ही अजान लावली त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे त्यांना सस्पेंड करायला हवं. कारवाई झालीच पाहिजे, त्याशिवाय आंदोलन शांत होणार नाही, असंही योगेश सागर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button