खेल

BREAKING NEWS : इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कोणा कोणाला मिळाली संधी

इंग्लंडच्या दौऱ्यासाठी आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारताचा संघ आज जाहीर करण्यात आला आहे. या संघात एक मोठा बदल करण्यात आला असून अष्टपैलू हार्दिक पंड्याला या संघातून वगळण्यात आले आहे.

भारताच्या कर्णधारपदी विराट कोहली आणि उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणे आहे. भारताच्या सलामीसाठी रोहित शर्मा, शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर भारताच्या मधल्या फळीसाठी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, लोकेश राहुल यांचे स्थान कायम राहीले आहे. लोकेश राहुल जर पूर्णपणे फिट असेल तरच त्याला संधी देण्यात येणार आहे. तो जर फिट नसेल तर त्याच्या जागी अन्य एका खेळाडूची निवड करण्यात येऊ शकते.

भारतीय संघात यावेळी आर. अश्विन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. हे चौघेही फिरकीपटू असले तरी ते चांगली फलंदाजीही करू शकतात, त्यामुळे त्यांचा अष्टपैलू म्हणून संघात विचार केला जाऊ शकतो. भारतीय संघात वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारताच्या या संघात दोन यष्टीरक्षकांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांचा समावेश करण्यात आला आहे. साहाला सध्या दुखापत झाली आहे, पण तो फिट असेल तरच त्याला संघात स्थान देण्यात येणार आहे. या संघात चार नेट गोलंदाजही निवडण्यात आले आहेत. भारताच्या फलंदाजांना ते सराव करण्यात मदत करणार आहेत. यामध्ये प्रसिध कृष्णन, अभिमन्यू इश्वरन, आव्हेश खान आणि अरझान नागवासवाला यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यात पाच कसोटी सामने खेळणार आहे. पण त्यापूर्वी त्यांना अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी खेळावी लागणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये नॉटिंगहॅम येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना १२ ते १६ ऑगस्ट या दिवसांमध्ये लॉर्ड्सवर होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ते २९ ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये लीड्सच्या मैदानात होणार आहे. इंग्लंडच्या दौऱ्यातील भारताचा चौथा सामना २ ते ६ सप्टेंबर या दिवसांमध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील अखेरचा सामना हा १० ते १४ या कालावधीत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button