“पुण्यातील बडा शेख, छोटा शेख दर्गा म्हणजे पुण्येश्वर-नारायणेश्वराची मंदिरं”, मनसेच्या दाव्याने नवा वाद
मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यातील बडा शेख दर्गा आणि छोटा शेख दर्गा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरं उद्ध्वस्त करून बांधल्याचा दावा केलाय.
देशभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं उद्ध्वस्त करून मशिदी बांधल्याचा दावा होत आहे. यातील अयोध्या, काशी येथील प्रकरणं न्यायालयात पोहचली आहेत. आता या वादाची मालिका पुण्यापर्यंत पोहचली आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यातील बडा शेख दर्गा आणि छोटा शेख दर्गा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरं उद्ध्वस्त करून बांधल्याचा दावा केलाय. तसेच या प्रकरणी राज्य सरकारने पुरातत्व खात्याचा अहवाल तपासून कारवाई करावी, अशी मागणी अजय शिंदे यांनी केलीय.
अजय शिंदे म्हणाले, “ज्यांनी आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना मारलं त्या औरंगजेबाचा एक नातू या पुण्यात वारला तेव्हा त्याची कबर बांधण्यात आली. त्याकाळी पुणे शहराचं नाव बदलून नातवाचं नाव देण्याचा प्रयत्न झाला. इतका वाईट इतिहास पुण्यश्वराच्या जागेवर उभ्या असलेल्या दर्ग्याचा आहे. असं असूनही आम्ही त्यावर बोलू नये असं कोणी म्हणत असेल तर ते अगदी चुकीचं आहे.”