पैशाच्या मोहाने काकाच्या नावाने बनावट कागदपत्रं, उचललं 16 लाखांचे कर्ज; पोलिसांकडून मॅनेजरसह पुतण्याला अटक

होंडा शोरुमसाठी पुतण्याने काकाच्या नावाचे बनावट कागदपत्र तयार केले. याच्यामाध्यमातून बँकेतून 16 लाख रुपयांचे कर्ज उचलले. मात्र, पोलिसांच्या मदतीने पुतण्याची पोलखोल झाली. पोलिसांनी पुतण्यासह बँक मॅनेजरला अटक केली. साकोली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पैशाच्या मोहापाई माणूस आपल्याच नातेवाईकाची आर्थिक लुबाडणुक करत असल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यात उघड़ झाला आहे. होंडा शोरुमसाठी आरोपी पुतण्याने चक्क आपल्या काकाचे बनावट दस्तावेजावर बँकेत सादर करुन तब्बल 16 लाखांचे कर्ज काकाच्या नावावर काढले. आपल्या सख्या काकाची फसवणूक केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील सेंदुरवाफा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत उघडकीस आली आहे.
याप्रकरणी बँक मॅनेजरसह पुतण्याला साकोली पोलिसांनी अटक केली असून मोरेश्वर मेश्राम असे मॅनेजरचे नाव असून मंगेश पंढरी पर्वते असे पुतण्याचे नाव आहे. आरोपी मंगेश पर्वते याला होंडा शोरुम काढण्यासाठी 13 लाख रुपयांच्या कर्ज़ाची गरज होती. यासाठी आरोपीने बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेला संपर्क केला. कर्जासाठी जमिन मॉर्गेज करन्यासाठी अट असल्याने आरोपीने गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील आपले काका यांचे बनावट कागदपत्र तयार केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
फिर्यादी रुपचंद भाऊराव पर्वते (55) यांच्या नावाने असलेल्या नवेगावबांध येथील गट क्र. 946/7 वरील प्लॉट क्र. 2 वर घर बांधकामासाठी बनावट कागद पत्र तयार केलीत. 13 लाखांचे गृहकर्ज काकाला न कळता मंजूर करून घेतले. यासाठी आरोपी मॅनेजर मोरेश्वर मेश्राम याने त्याला मदत केली. मात्र कर्जाचे हप्ते थकल्याने फिर्यादीला अर्थात काकाला बँकेकडून नोटीस आल्याने संपूर्ण प्रकार उघडीस आला.
याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या काकाने बँकेकडे याबाबत माहिती मागितली. तसेच काकाने विचारणा केल्यानंतर पुतण्याने आपण केल्याचे कबूल केले. तसेच कर्जाचे हप्ते भरण्यासाठी परत 3 लाख रुपयांची मागणी केली. काकाने पुतण्याला मदत केली. मात्र आरोपी पुतण्याने पैसे कर्जाचे हप्ते न भरता परस्पर वापरल्याने काकाने आरोपी पुतण्या आणि बँक मॅनेजर विरोधात साकोली पोलिसात 16 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांवर कलम 420, 409, 467, 471, 34 भादंवि अन्यवे गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशा माहिती साकोलीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी दिली.