रमाई आवास योजनेतून राज्यात सव्वा लाख घरे बांधणार, धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा
राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. रमाई आास घरकुल योजनेअंतर्गत राज्यात सुमारे सव्वा लाख घरे बांधण्यात येणार आहेत.
मुंबई: राज्याचे समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केली आहे. रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत राज्यात सुमारे सव्वा लाख घरे बांधण्यात येणार आहेत. ग्रामीण आणि शहर भागात बांधण्यात येणाऱ्या या घरकुल योजनेच्या उद्दिष्टांना आज मंजुरी देण्यात आली आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे म्हणून राज्य सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेनंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास मंजुरी देण्यात आली आहे. तशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव अ. को. अहिरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिल्याचा निर्णय निर्गमित केला आहे.
आणखी घरे बांधणार
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजना निर्माण करण्यात आली आहे. या योजनेतून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात या उद्दिष्टात आणखी वाढ करण्यात येईल. तसेच या योजनेस कुठेही निधीची कमतरता भासणार नाही, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.