Dadar Kabutar Khana: कबुतरखाना बंद झाल्यावर दादरमध्ये पक्ष्यांसाठी फिडिंग कार, मनीषा कायंदे भडकल्या, म्हणाल्या, ‘यांचा इगो हर्ट…’

मुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्याच्या परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास मनाई केल्यानंतर आता जैन समाजातील काही लोकांनी एक नवीन पद्धत सुरु केली आहे. या परिसरातील कबुतरं (Kabutar Khana) उपाशी राहू नयेत, यासाठी दादरमध्ये (Dadar news) कारच्या टपावर धान्याचा ट्रे ठेवला जात आहे. अशा कार दादर परिसरात फिरवण्याची योजना आखण्यात आली आहे. लालबागमधील (Lalbaug) महेंद्र संकलेचा या व्यक्तीकडून कबुतरांना (pigeons) खाद्य पुरवण्यासाठी या ‘फिडिंग कार’ चालवल्या जात आहेत. एवढेच नाही तर आणखी 12 गाड्या येणार आहेत, असेही संकलेचा यांनी सांगितले. यावरुन आता शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे आक्रमक झाल्या आहेत. मनीषा कायंदे यांनी या सगळ्यावर सडकून टीका केली आहे.
या प्रकाराला मुजोरी नाही तर काय म्हणायचे. कोर्ट हे सर्वोच्च स्थान आहे, त्याला तुम्ही जुमानत नाही. लालबागचा माणूस इकडे गाडी घेऊन फिरत आहे. गाडीच्या वर ट्रे बांधायला तुम्ही आरटीओची परमिशन घेतली आहे का? तुमचा अट्टाहास की दादरमध्येच येणार, कितीही लोकांना त्रास झाला तरी. याकडे पोलीस आरटीओ आणि महानगरपालिका सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली.
कबुतरखान्याचा प्रश्न सामाजिक आहे की धार्मिक आहे? त्यांचा इगो हर्ट झाल्यासारखं ते वागतात. ही थोडीथोडकी लोक आहेत, त्यांना काय सिद्ध करायचे आहे? त्यांच्या समाजामधल्या नेत्यांनी समोर यावं आणि यावर तोडगा काढावा. एवढं तुमचं कबुतरांवर प्रेम आहे, तर सगळ्या प्राण्यांवरदेखील प्रेम करा. जैन मंदिरात जाळ्या का लावल्या, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तर ते म्हणाले की, मंदिरातील पंख्यामध्ये अडकून कबुतरं मरतील, पण मग तुम्ही पंखे का नाही बंद करत? कबुतरांमध्ये दुसऱ्यांचे नुकसान झाले तर चालेल. कबुतरांची वाढ झपाट्याने होत आहे. यावर काहीतरी अंकुश आणला पाहिजे. जैन समाजाच्या आंदोलनावेळी काही महिला तिकडे चाकू घेऊन आल्या होत्या. त्यांना तिकडे बोलावण्यात आले होते, हे सगळं व्हिडीओत स्पष्टपणे दिसत आहे. तुमचं कबुतरांवर प्रेम आहे, तर तुम्ही तुमच्या पिंजरामध्ये दोन-चार कबुतरं ठेवा. तुम्हाला सार्वजनिक जागेत वाद का निर्माण करायचा आहे, असा सवाल मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला.