‘चड्डी गँग’ने एका रात्रीत जळगावमधील 3 मंदिरं फोडली! धक्कादायक CCTV फुटेज समोर

जळगावमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. मध्यरात्रीनंतर मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी चांदीच्या पादुकांबरोबरच मूर्ती, दानपेटीमधील रक्कम आणि इतर साहित्य चोरल्याची घटना समोर आली आहे. ‘चड्डी गँग’नं या चोऱ्या केल्याचं सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालं आहे.
रात्री अडीचच्या सुमारास घडला हा प्रकार
जळगाव शहरात मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चोरी केली. तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने तेथून पेन ड्राईव्ह चोरून नेला. याशिवाय बाहेर गावी गेलेल्या च्या घरात डल्ला मारण्याच्या उद्देशाने चोरांनी घरफोडी केली. ही घटना मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. एकाच रात्री चार ठिकाणी चोरी झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
मंदिरातून काय चोरलं?
रायसोनी नगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 700 ग्रॅम चांदीच्या पादुका, गणपतीची दीड फुटाची धातूची मूर्ती तसेच दानपेटीतील रक्कम चोरून नेली. गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नव्हती. त्यामुळे दानपेटीमध्ये नेमकी किती रक्कम होती, हे नेमके समजू शकलेले नाही. मंदिर व घरामध्ये चोरी करणारे चौघेजण हे इतर राज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हातात चॉपर, चाकू, तलवारी
चोरटे या परिसरातून फिरत असताना त्यांच्या हातात चॉपर, चाकू, तलवारी यासारखे शस्त्रदेखील होते, अशी माहिती या परिसरातील नागरिकांनी दिली आहे. ‘चड्डी गँग’ने केलेल्या चोरीच्या घटना परिसरातील सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. तोंडाला मास्क, रुमाल लावून केवळ चड्डीवर असलेले चारजण रस्त्याने येताना दिसत आहे.
सीसीटीव्हीमध्ये काय रेकॉर्ड झाल?
एका घराकडे पाहत जात ते मंदिरांमध्ये प्रवेश करून चोरी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मंदिरातून निघताना एकाने चप्पल हातात घेतलेली आहे, तर एकाने कमरेला बांधलेली दिसत आहे. मध्यरात्री सीसीटीव्ही फुटेज कैद झाले आहे. केवळ चड्डी परिधान केलेले दोन चोर मंदिरात घुसून सामानासहीत बाहेर पडत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
…तर जबाबदार कोण?
अशाप्रकारे चोरटे मोकाटपणे फिरताना पोलिसांकडून या भागात पेट्रोलिंग का केलं जात नाही असा सवाल आता स्थानिकांकडून विचारला जात आहे. हातात शस्र घेऊन फिरणाऱ्या या चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने एखाद्याच्या जीवचं काही बरं वाईट केलं तर याचा जबाबदार कोण असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.