झारखंडमधील मद्य घोटाळ्यात अटक, महाराष्ट्रात महत्त्वाची कंत्राटं घशात, श्रीकांत शिंदेंच्या फौंडेशनला मोठ्या देणग्या; सुमित फॅसिलिटीजचे प्रकरण नेमकं काय?

झारखंडमधील मद्य विक्री घोटाळ्यात अटक झालेल्या अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीज कंपनीला राज्यातील अनेक महत्त्वाची कंत्राटं मिळाली आहेत . या कंत्राटांमध्ये देखील गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फौंडेशनला सुमित फॅसिलिटीजकडून देणग्या देण्यात आल्याचा आरोप होतोय. नेमकं काय आहे हे प्रकरण हे सविस्तर पाहुयात.
सुमित फॅसिलिटीज लिमिटेड हे नाव गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात चर्चेत आहे. नवी मुंबई , कल्याण , ठाणे या महापालिकांची यांत्रिक सफाईची कोट्यवधी रुपयांची कंत्राटं या कंपनीला मिळाली आहेत . मात्र ही कंपनी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात तेव्हा आली जेव्हा कंपनीला राज्यात 108 क्रमांकाच्या अँब्युलन्सची सेवा पुरवण्याचं दहा वर्षांसाठीचे तब्ब्ल सहा हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळालं . याच सुमित फॅसिलिटीजचे मुख्य संचालक असलेल्या अमित साळुंखे याला झारखंड मधील मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे.
Who Is Amit Salunkhe : कोण आहे अमित साळुंखे?
अमित साळुंखेने पुण्यातील बी एम सी सी महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे तर स्पेनमधील एका युनिव्हर्सिटीतून एम बी ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे .
2016 मध्ये त्याने सुमित फॅसिलिटीज या कंपनीत काम करायला सुरुवात केली .
1992 मध्ये नोंदणी झालेल्या या कंपनीच्या संचालक मंडळावर अमित साळुंखेच्या आधी त्याचे वडील प्रभाकर साळुंखे, भाऊ सुमित साळुंखे , आई सुनंदा साळुंखे आणि इतर नातेवाईक संचालक राहिलेले आहेत .
अमित साळुखे मुख्य संचालक असलेल्या सुमित फॅसिलिटीज या कंपनीला मुंबई , ठाणे , कल्याण डोंबिवली महापालिकांची कोट्यवधी रुपयांची कंत्राटे मिळाली आहेत .
यांत्रिक सफाई आणि स्वछतेच्या कामांशी संबंधित ही कंत्राटे आहेत .
आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी 108 क्रमांकाच्या अँम्बुलन्सचे कंत्राटही अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीज या कंपनीला मिळाले आहे .
सध्या गरिमा तोमर , अजित दरंदळे , सुनील कुंभारकर हे अमित साळुंखेसह कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत.
अमित साळुंखेसह झारखंड पोलिसांनी अटक केलेला मद्य व्यवसायिक सिद्धार्थ सिंघानिया हा देखील कंपनीचा संचालक राहिला आहे .
महाराष्ट्राच्या बाहेर देखील अनेक राज्यांमध्ये अमित साळुंखेच्या सुमित फॅसिलिटीजला वेगवगेळी कंत्राटे मिळालेली आहेत.
कंपनीचाच दाव्यानुसार देशातील 22 राज्यांमध्ये कंपनी काम करते आहे .
कंपनीच्या दाव्यानुसार कंपनीकडे 26,00,00,000.00 रुपयांचे भाग भांडवल आहे.
झारखंड सरकारने 2022 मध्ये नवीन मद्यविक्री धोरण राबवायचं ठरवलं. ज्यानुसार दारूची किरकोळ विक्री सरकारी दुकानांमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सरकारी दुकानांमध्ये मनुष्यबळ पुरवण्याचं कंत्राट सुमित फॅसिलिटीज कंपनीला देण्यात आलं.
त्यावेळी झारखंड सरकारमध्ये उत्पादन शुल्क विभागाचे सचिव असलेले आय ए एस अधिकारी विनयकुमार चौबे यांच्या मध्यस्तीतून हे कंत्राट मिळालं होतं . मात्र 2024 ला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात ईडीने कारवाई सुरु केली. तेव्हा विनयकुमार चौबेंनी सोरेन यांच्या विरोधात ईडी ला माहिती पुरवली आणि सोरेन यांना अटक झाली . मात्र काही महिन्यांनी झालेली विधानसभा निवडणूक जिंकून हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री बनले. तेव्हा त्यांनी चौबे आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या मागे चौकशीचा भुंगा लावला. त्यामध्ये चौबे यांच्यासह अमित साळुंखे आणि इतर अकरा जणांना अटक झाली .
मात्र अमित साळुंखे आणि सुमित फॅसिलिटीज वादात सापडण्याची ही काही पहिलीचे वेळ नाही. एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपत आलेला असताना काही दिवस आधी या कंपनीला 108 क्रमांकाच्या अँम्ब्युलन्सची सुविधा पुरवण्याचं कंत्राट देण्यात आलं. मात्र आधीच्या कंत्राटापेक्षा हे कंत्राट देताना मोठ्या प्रमाणात रक्कम वाढवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
त्यानंतर उच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचलं आणि न्यायालयाने ते कंत्राट वैध ठरवलं. मात्र नव्याने सत्तारूढ झालेल्या राज्य सरकारने त्यामध्ये काही बदल सुचवले आणि मे 2025 मध्ये झालेल्या करारानुसार सुमित फॅसिलिटीज बरोबर आधी ज्या कंपनीकडे हे कंत्राट होतं त्या बीव्हीजी कंपनीला या कंत्राटात सामावून घेण्यात आलं.
Maharashtra 108 Ambulence Contract : 108 क्रमांकाच्या अँब्युलन्सचे हे कंत्राट नक्की काय आहे?
राज्यात 1756 अँब्युलनासच्या माध्यमातून 108 क्रमांकाच्या अँब्युलन्सची सेवा देण्यात येईल.
पहिल्या वर्षी राज्य सरकार त्यासाठी 637 कोटी रुपये मोजेल .
दरवर्षी या कंत्राटाच्या रकमेत पाच टक्क्यांनी वाढ होत जाईल.
अशाप्रकारे दहा वर्षांमध्ये राज्य सरकार सहा हजार कोटी रुपये कंपनीला देईल
हे कंत्राट मिळाल्याच्या बदल्यात खासदार आणि एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या फौंडेशनला सुमित साळुंखे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्याचा आरोप होत आहे. त्यातून शिंदेंच्या चौकशीची मागणी विरोधक करतायत .
अमित साळुंकेला अटक करून रांचीमधील न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. पण इकडे महाराषट्रात त्यावरून राजकीय आरोप – प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली .
एखाद्या व्यवसायाची किंवा कंपनीची वाढ जेव्हा अतिशय वेगाने होते तेव्हा पडद्याआडून राजकीय गॉडफादर त्यासाठी काम करत असतो. पण जेव्हा हा राजकीय गॉडफादर स्वतःच अडचणीत सापडतो तेव्हा तेच प्राक्तन त्या कंपनीच्या नशिबी येतं. अनैसर्गिक पद्धतीने झालेली कंपनीची आणि व्यवसायाची प्रगती मग आरोपांचा आणि पुढे तपासाचा विषय बनते. सुमित फॅसिलिटीजच्या नशिबी तर झारखंडमध्ये हे प्राक्तन आलं आहे. महाराष्ट्रात काय वाट्याला येतंय हे पाहायचं.