Uncategorized

Nagpur News : नागपूरच्या माजी नगरसेवकाचा बॉडीबिल्डर मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकला; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरात बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसच्या नावाखाली सुरू असलेल्या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत गणेशपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका बॉडीबिल्डर आणि माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा संकेत बुग्गेवार याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये एमडी ड्रग्ज, कार आणि मोबाईलचा समावेश आहे.

प्रकरण काय?
गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने गणेशपेठ बस स्टँड जवळील जाधव चौकात रविवारी रात्री उशिरा सापळा रचला. दरम्यान, एम.एच ४५ ए. व्ही ४५५४ या क्रमांकाची महिंद्रा थार एसयूव्ही कार तिथे येताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकत कार थांबवली. कारमध्ये असलेल्या संकेत बुग्गेवार याला ताब्यात घेऊन पोलिसांनी तपासणी केली असता, त्याच्या खिशातून चार पाऊचमध्ये भरलेले १६.७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हे घातक अमली पदार्थ सापडले. या ड्रग्जची बाजारभाव किंमत अंदाजे १ लाख ६७ हजार ७०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

१७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
संकेतकडे झालेल्या प्राथमिक चौकशीत, त्याने हे एमडी ड्रग्ज प्रणय बाजारे (वय २५, रा. आशिर्वाद नगर, एनआयटी मार्केटजवळ) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र पोलिसांनी प्रणय बाजारेच्या घरी छापा टाकण्याचा प्रयत्न केला असता, तो फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी संकेत बुग्गेवारकडून एक महिंद्रा थार कार, मोबाइल फोन आणि एमडी ड्रग्जसह एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

फिटनेस इंडस्ट्रीमध्ये खळबळ
सूत्रांच्या माहितीनुसार, संकेत हा व्यावसायिक बॉडीबिल्डर असून, त्याने विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. तसेच तो शहरातील काही नामांकित जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होता. पोलिसांना संशय आहे की, बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसच्या आड त्याने ड्रग्जची तस्करी सुरू केली होती. या प्रकरणामुळे नागपूरसह संपूर्ण फिटनेस इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.

फिटनेससारख्या आरोग्यवर्धक क्षेत्राचा वापर करत समाजातील विश्वासार्ह व्यक्ती ड्रग्जच्या अंधाऱ्या दुनियेत सहभागी होत असल्याचे हे प्रकरण अधोरेखित करते. पोलिसांनी संपूर्ण नेटवर्कचा शोध सुरू केला असून, प्रणय बाजारेसह इतर संबंधित आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी अशा प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button