Shravan 2025 : उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु झाला, महाराष्ट्रात कधी? यंदा किती श्रावणी सोमवार?

श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते. अभिषेक, पठन, होम – हवन, उपवास, व्रत केले जातात. त्यात निराहार व्रत, एकान्नव्रत, मौन व्रत, कर्पूरहोम, दानधर्म, सत्यसंकल्प केले जातात. उत्तर भारतीय पंचांगनुसार त्यांचे महिना हा 15 दिवसांपूर्वीच सुरु होतात. उत्तर भारतीयांचा तिथी ही पौर्णिमा ते पौर्णिमा अशी असते. तर मराठी पंचांगानुसार अमावस्या ते अमावस्या असा मराठी महिना मानला जातो. त्यामुळे उत्तर भारतीयांचा श्रावण महिना 11 जुलैपासून सुरू झालेला आहे. तर महाराष्ट्रात श्रावण महिना कधी सुरु होणार आहे. यंदा किती श्रावणी सोमवार आणि मंगळागौरी, तिथी, पूजा शिवमूठ जाणून घ्या.
महाराष्ट्रात श्रावण सोमवार कधीपासून सुरू होणार?
महाराष्ट्रात मराठी पंचांगानुसार आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या 24 जुलै 2025 ला आहे. त्यानंतर 25 जुलै 2025 शुक्रवारपासून श्रावण मास सुरु होणार आहे. तर 23 ऑगस्टपर्यंत श्रावण महिना असणार आहे.
यंदा श्रावणी सोमवार किती?
महाराष्ट्र श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व आहे. त्यासोबत मंगळवारी मंगळागौरीचा उत्साह आणि शुक्रवारी जिवंतीकाचे पूजन करण्याची परंपरा आहे. तर यंदा श्रावणात 4 श्रावणी सोमवारचं व्रत असणार आहे. प्रत्येक सोमवारी महादेवावर शिवामूठ अर्पण करण्याची परंपरा आहे.
पहिला सोमवार – 28 जुलै 2025 – शिवामूठ – तांदूळ
दुसरा सोमवार – 4 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – तीळ
तिसरा सोमवार – 11 ऑगस्ट 2025 शिवामूठ – मूग
चौथा सोमवार – 18 ऑगस्ट 2025 – शिवामूठ – जव
मंगळागौरी 2025 तारीख
यंदा श्रावणातील मंगळागौरी तिथी अतिशय खास असणार आहे. कारण श्रावणातील 4 मंगळवारी विशेष सण असणार आहे.
पहिला मंगळवार – 29 जुलै 2025 – नागपंचमी
दुसरा मंगळवार – 5 ऑगस्ट 2025 – पुत्रदा एकादशी
तिसरा मंगळवार – 12 ऑगस्ट 2025 – अंगारक संकष्ट चतुर्थी
चौथा मंगळवार – 19 ऑगस्ट 2025 – अजा एकादशी
जिवंतीकाचे पूजन तिथी
पहिला शुक्रवार – 1 ऑगस्ट 2025
दुसरा शुक्रवार – 8 ऑगस्ट 2025 – नारळी पौर्णिमा
तिसरा शुक्रवार – 15 ऑगस्ट 2025 – श्रीकृष्ण जयंती
चौथा शुक्रवार – 22 ऑगस्ट 2025 – पोळा
श्रावण महिन्याचे महत्त्व!
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आणि शुभ मानला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचा पालनहार भगवान विष्णू क्षीर सागरात योगनिद्रात जातात. म्हणून याला चातुर्मास असं म्हटलं जातं. या चातुर्मासात ब्रह्मांडाची जबाबदारी महादेवावर सोपवली जाते. अशात महादेव भक्ताच्या समस्या ऐकतो. त्यामुळे श्रावणात महादेवाला जल अर्पण करुन त्यांना प्रसन्न केलं जातं.