कुत्र्याच्या पिल्लाने घेतला चावा, छोटी जखम समजून कबड्डी खेळाडूने केलं दुर्लक्ष; पण तीन महिन्यांनी घडलं असं काही; सगळं गाव हादरलं

उत्तर प्रदेशात राज्यस्तरीय कबड्डी खेळाडूचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ब्रिजेश सोलंकी असं या कबड्डी खेळाडूचं नाव आहे. बुलंदशहर शहरातील या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. याचं कारण ब्रिजेश सोलंकीने माणुसकी दाखवत केलेल्या मदतीमुळे आपला जीव गमावला आहे. ब्रिजेश तीन महिन्यांपूर्वी एका कुत्र्याच्या पिल्लाची सुटका करत होता. मात्र याच पिल्लाने त्याचा चावा घेतला होता. यादरम्यान ब्रिजेशकडून सर्वात मोठी चूक झाली. त्याने छोटीसी जखम समजून या चाव्याकडे दुर्लक्ष केलं आणि रेबीजचं इंजेक्शनच घेतलं नाही.
ब्रिजेशचा मृत्यूच्या काही दिवसांआधी शूट केलेला एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो रेबीजमुळे होणाऱ्या वेदनामुळे विव्हळताना आणि रडताना दिसत आहे. एका व्हिडीओत त्याला अत्यंत हिंसक रेबिज वेदनांचा त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसत आहे.
त्याचे प्रशिक्षक प्रवीण कुमार म्हणाले, “ब्रिजेशने त्याच्या हाताला होणाऱ्या वेदना ही नेहमीची कबड्डीची दुखापत असा समज करुन घेतला. चावा किरकोळ होता, पण तो गंभीर आहे असं त्याला वाटत नव्हतं. यामुळेच त्याने लस घेतली नाही,” असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
26 जून रोजी सराव सत्रादरम्यान ब्रिजेशने आपल्याला बरं वाटत नसल्याची तक्रार केली. यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. परंतु त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नोएडा येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
त्याचा भाऊ संदीप कुमार याने आरोप केला की ब्रिजेशला अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार नाकारण्यात आले. “अचानक, त्याला पाण्याची भीती वाटू लागली आणि त्याला रेबीजची लक्षणे दिसू लागली, परंतु खुर्जा, अलीगढ आणि अगदी दिल्ली येथील सरकारी रुग्णालयांमध्ये आम्हाला उपचार नाकारण्यात आले. नोएडामध्येच डॉक्टरांनी त्याला रेबीजची लागण झाल्याची पुष्टी केली,” असा दावा त्याने केला आहे.
अखेर 28 जून रोजी ब्रिजेशने जीव गमावला. ब्रिजेश हा बुलंदशहरमधील फरना गावचा रहिवासी होता. संपूर्ण गाव या लाडक्या कबड्डीपटूला अंतिम निरोप देण्यासाठी बाहेर पडले होते. दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.