इंडसइंड बँक गटांगळ्या खाताच खातेधारकांना आठवली Yes बँक; पैसे सुरक्षित तर आहे ना? अनेकांचाच प्रश्न

जागतिक आर्थिक मंदीचं सावट आणि त्यातच वित्तीय तुटवडा यांसारख्या समस्यांमुळं अर्थव्यवस्थेला वारंवार धक्के बसताना दिसत आहेत. ही जगातील कोणा एका अर्थव्यवस्थेची स्थिती नसून या आव्हनाचा सामना जगातील सर्वच देश करताना दिसत आहेत. अगदी भारतही इथं अपवाद ठरलेला नाही. मागील काही वर्षांपासून देशात बँकांच्या खासगीकरणापासून ते अगदी कैक बँकांच्या दिवाळखोरीपर्यंची वृत्त समोर आली. या साऱ्यामध्ये खातेधारकांचा जीव सतत टांगणीला लागल्याचं पाहायला मिळालं.
महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक, न्यू इंडिया कॉऑपरेटीव्ह बँक यांसारख्या बँकांमध्ये हिशोबाशी झालेली हेळसांड आणि त्यानंतरही आर्थिक आव्हानं चर्चांमधून मागे पडत नाहीत तोच इंडसइंड बँकेसंदर्भातील एका वृत्तानं खातेधारकांची झोप उडवली.
मंगळवारी (IndusInd Bank) इंडसइंड या खासगी क्षेत्रातील बँकेचे शेअर कोसळले. सोमवारी बँकेचे शेअर 5 टक्क्यांनी कोसळले. ज्यानंतर शेअरमध्ये सातत्यानं ही घसरण सुरूच राहिली. सलग पाचव्या दिवशी बँकेचे शेअर 27.06 टक्क्यांनी कोसळून मागील 52 आठवड्यांमधील निच्चांकी स्तरावर पोहोचले. यावेळी शेअरची किंमत 656 रुपये इतकी नोंदवण्यात आली आणि या साऱ्यामध्ये खातेधारकांना Yes बँक आठवली.
मागे वळून पाहिलं असता वर्षभरापूर्वी इंडसइंड बँकेचे शेअर साधारण 40 टक्क्यांनी कोसळले. मंगळवारी ही आकडेवारी चिंताजनकरित्या खाली आली. एकाच दिवशी बँकेचे शेअर थेट 27 टक्क्यांनी कोसळले. इंडसइंड बँकेच्या फॉरेक्स डेरिवेटिव पोर्टफोलियोच्या हिशोबामध्ये तब्बल 1577 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर हे शेअर अनपेक्षितरित्या कोसळले आणि त्यामुळं या बँकेचं मार्केट कॅप yes बँकेच्याही मागे आलं.
मार्केट कॅपच्या बाबतीत इंडसइंड बँकेची आकडेवारी 51,110 कोटी रुपये असून, येस बँकेचा हाच आकडा 51,350 कोटी रुपये इतका आहे. ज्यामुळं मार्केट कॅपच्या बाबतीत येस बँकेनं इंडसइंड बँकेला पिछाडीवर टाकलं आहे हेच स्पष्ट होतंय.
इंडसइंड बँकही येस बँकेच्याच पावलावर पाऊल ठेवताना दिसत, असल्याची भीती अनेकांच्या मनात घर करत आहे. कारण, तिथंही अशाच पद्धतीनं कॉरपोरेट गवर्नेंसच्या बेजबाबदारपणासमवेत कर्जाशी संबंधित हिशोबात काही मोठ्या चुका आढळल्यानं Yes बँक दिवाळखोरीपर्यंत पोहोचली होती. रिझर्व्ह बँकेनं करडी नजर ठेवत या गैरव्यवाहारांना उजेडात आणलं आणि या सर्व घटनांमुळं बँकेचे शेअर विचारही केला नसेल इतक्या वेगानं कोसळले जे पूर्वपदावर येऊच शकलेले नाहीत. ही परिस्थिती इतकी बिघडलीकी, की अखेर केंद्र शासनानं पुढाकार घेत बँकेला हातभार लावल्याचं पाहायला मिळालं.
बँकेची एकूण देय रक्कम 24 हजार कोटी रुपयांवर पोहोचल्यानं कैक निर्बंध लावण्यात आले आणि तिथं खातेधारकांमध्ये एकच गोंधळ माजला. अखेर बँकेची स्थिती आणि खातेधारकांच्या मनात असणारा अविश्वास दूर करण्यासाठी केंद्र शासन आणि आरबीआयनं पुढाकार घेत बँक बंद होणार नसल्याची माहिती देत खातेधारकांना किमान दिलासा देऊ केला.
बँकेत ठेवलेली रक्कम कितपत सुरक्षित?
बँकांमध्ये ठेवण्यात आलेली FD खात्यातील रक्कम ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक ग्राह्य धरली जाते. पण, दर दिवशी आर्थिक घोटाळ्यांमध्ये विविध बँकांची नावं सतत समोर येत असल्यामुळं खातेधारक द्विधा मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळत आहे. निर्धारित परतावा आणि किमान जोखमीची गुंतवणूक म्हणून एफडीमध्ये पैसे गुंतवण्यास सामान्य प्राधान्य देत असले तरीही बँक दिवाळखोरीला जाण्याच्या भीतीनं आता या पर्यायाकडेही अनेकांनीच पाठ फिरवली आहे.
सर्व गोष्टी स्वीकारार्ह असल्या तरीही बँकेत कोणताही आर्थिक घोटाळा झाला तर, खातेधारकांना रक्कम काढण्यास मनाईचे निर्बंध लागू होतात आणि त्यांचा पैसा बँकेतच अडकतो. बँक डबघाईला गेल्यास विमा कव्हरअंतर्गत खातेधारकांना 5 लाख रुपयांची रक्कम परत केली जाते. थोडक्यात बँक बुडाली तरीही तुमची 5 लाख रुपयांची रक्कम सुरक्षितच असते.