आईसमोरच 5 वर्षांच्या चिमुकलीचा नरबळी, मंदिराच्या पायऱ्यांवर रक्त शिंपडलं; गावकरी बघत राहिले कारण..

गुजरातमधील आदिवासी बहुल धोटा उदयपूर जिल्ह्यामध्ये नरबळीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यक्तीने कुऱ्हाडीने पाच वर्षांच्या मुलीची गळा कापून हत्या केली. त्यानंतर त्या मुलीचे रक्त या व्यक्तीने एका मंदिराच्या पायऱ्यांवर अर्पण केलं. धक्कादायक बाब म्हणजे हा सारा प्रकार अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये घडला तरी कोणीही या व्यक्तीला थांबवण्यासाठी पुढे आलं नाही. सर्वजण शांतपणे हा सारा प्रकार पाहत उभे होते.
घरातून मुलीला उचलून नेलं
एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा सारा प्रकार पमेज गावामध्ये सोमवारी दुपारी घडला. रविवारी सकाळी मुख्य आरोपी लाला तडवी याने या मुलीचं तिच्या राहत्या घरातून आईसमोरच अपहरण केलं. लाला तडवी या मुलीला स्वत:च्या घरी घेऊन गेला. त्याने कुऱ्हाडीने या मुलीच्या मानेवर वार केले. यानंतर आरोपीने मुलीच्या कापलेल्या मुंडक्यामधून पडणारं रक्त जमा करुन त्यापैकी काही रक्त आपल्या घरातील एका छोट्या मंदिराच्या पायऱ्यांवर चढवलं. तडवीने केलेले हे कृत्य पाहून मृत मुलीची आई आणि गावकरी स्तब्ध झाले होते, असंही या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. आरोपी तडवीच्या हातात कुऱ्हाड असल्याने कोणीही त्याला विरोध केला नाही, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
आरोपी तांत्रिक-मांत्रिक नाही?
पोलीस उपनिरिक्षक (एएसपी) गौरव अग्रवाल यांनी आरोपी हा तांत्रिक-मांत्रिक असल्याचं वाटत नाही, असं म्हटलं आहे. तडवीने ही हत्या करण्यामागील खरा हेतू असून समोर आलेला नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ताडवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
नरबळीचा प्रकार?
एएसपी अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटा उदयपुर जिल्ह्यातील बोडेली तालुक्यात ही घटना घडली. तक्रारदार महिलेने तिच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या लाला भाई तडवीने हल्ला करुन मारुन टाकल्याचं म्हटलं आहे. मृत मुलीचं रक्त आरोपीने त्याच्या घरातील मंदिराच्या पायऱ्यांवर शिंपडल्याचंही महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळेच हा नरबळीचा प्रकार असल्याची पोलिसांना शंका असून तडवीवर यापूर्वी असे काही गुन्हे आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रश्नांची उत्तर पोलीस शोधत आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. सध्या या हत्येमागील हेतू काय आहे याचं कारण शोधलं जात आहे. या सर्व प्रकारामध्ये इतर कोणाचा सहभाग होता का? ही हत्या वादातून झालेली आहे का? या हत्येचं नेमकं कारण काय आहे? या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत.