
सध्या आयपीएलचे (IPL 2024) रंगदार सामने सुरू आहेत. प्लेऑफसाठी रस्सीखेच सुरु असताना बीसीसीआयने दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन ऋषभ पंतवर मोठी कारवाई केली आहे. स्लो ओव्हर रेटमुळे कॅप्टन ऋषभ पंतवर 30 लाखांची दंडात्मक कारवाई केली आहे. तर एका सामन्यासाठी ऋषभला निलंबित देखील करण्यात आलं आहे. त्यामुळे आता दिल्लीला ऋषभ पंतच्या (Rishabh Pant suspended) अनुपस्थितीत आगामी सामना खेळावा लागणार आहे.
ऋषभ पंतला यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल एका सामन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅच रेफरीच्या या निर्णयाला दिल्ली कॅपिटल्स संघानेही आव्हान दिले होते, परंतु बीसीसीआयने सखोल चौकशी केल्यानंतर पंचाचा निर्णय योग्य असल्याचा कौल दिला. ऋषभच्या अनुस्थितीत आता दिल्लीची जबाबदारी कोण सांभाळणार? असा सवाल विचारला जातोय. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श किंवा अक्षर पटेल यापैकी एका खेळाडूला एक सामन्याचा कॅप्टन केला जाऊ शकतो. तर विकेट किपर म्हणून कोणाला संधी मिळणार? यावर देखील लक्ष असेल.
बीसीसीआयने निवेदनात काय म्हटलंय?
आयपीएल आचारसंहितेच्या कलम 8 नुसार, दिल्ली कॅपिटल्सने मॅच रेफरीच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी बीसीसीआयकडे करण्यात आली. मॅच रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे याची पुष्टी झाली, असंही बीसीसीआयने निवेदनात म्हटलं आहे.
दिल्लीसाठी प्लेऑफचं गणित (DC Playoffs)
दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत झालेल्या 12 सामन्यांपैकी 6 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. या 6 विजयामुळे आता दिल्लीच्या खात्यात 12 गुण झाले आहेत. आता दिल्लीला जर प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामने जिंकावेच लागतील. दिल्लीला पुढचा सामना आरसीबीविरुद्ध खेळायचा आहे तर 14 मे रोजी दिल्लीचा सामना लखनऊविरुद्ध होणार आहे. दिल्लीला आता लखनऊ आणि चेन्नईच्या पराभवाची वाट पहावी लागणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ – डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (C), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशाग्रा, रसिक दार सलाम, शाई होप, इशांत शर्मा, विकी ओस्तवाल, झ्ये रिचर्डसन, पृथ्वी शॉ, ललित यादव, यश धुळ आणि स्वस्तिक चिकारा.