देश

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण…

राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. बारामती मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघावर आहे. पुण्यातील धायरीच्या मतदानकेंद्रावर मात्र एक अजब प्रकार घडला आहे. ईव्हीएम मशीनवर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानादरम्यानचा प्रकार घडला आहे.

बारामतीत महायुतीचा उमेदवार यावेळी राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार असून त्या घड्याळ या चिन्हावर लढत आहेत. म्हणून तिथं यावेळी कमळ हे चिन्ह दिसत नाहीये. त्यामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांचा हा असा संताप झाल्याचं बघायला मिळतंय.

आजोबा काय म्हणाले?
EVM वर फुल नाही. कमळ हे चिन्हच नाही. उमेदवार नाही तर आम्ही त्याला काय करणार. कमळाचं चिन्ह नाही तर आम्ही कसं मतदान करणार. मतदान करायचे आहे पण कमळ फुल कुठे आहे?, असा सवाल आजोबांनी केला आहे. आजोबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

पुण्यातील धायरी भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात नणंद-भावजय यांच्यात लढत होत आहे. सुनेत्रा पवार या घड्याळच्या चिन्हावर लढत आहेत. तर, सुप्रिया सुळे तुतारी चिन्हावर लढत आहेत. पवार कुटुंबीयातील दोन उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली होती.

सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज अजित पवारांच्या आई आशा पवार यांची काटेवाडीतील पवार फार्मवर जाऊन भेट घेतली. आपण दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काकीकडे जाऊन राहायचो. त्यांनी बनवलेले लाडू खूप आवडतात. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार
इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला धमकी दिल्याचे प्रकरणी आमदार भरणे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता सुप्रिया सुळे यांच्याकडून व्हिडिओ निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का..
बारामती : 18.63%

भोर : 13.80%

दौंड : 12.00%

खडकवासला : 14.00%

इंदापूर : 5.00 %

पुरंदर : 14.80 %

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button