देश

दादर स्थानकातील गर्दी कमी होणार; 10-11 प्लॅटफॉर्मच्या डिझाइनमध्ये बदल

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकातील सर्वात गर्दीचे स्थानक म्हणजे दादर. दादर स्थानकात गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक योजना राबवण्यात येत आहे. अलीकडेच रेल्वेने दादर स्थानकातील प्लॅटफॉर्मसंदर्भातही निर्णय घेतला होता. त्याचसंदर्भात आता मोठी बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेने दादर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 च्या संरचनेत (डिझाइन) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11च्या डिझाइनमध्ये बदल करण्याचे काम सुरू केले आहे. या बदलामुळं कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांना लोकलमध्ये दोन्ही बाजूंनी चढता आणि उतरता येणार आहे. म्हणजेच मध्य रेल्वे डबल डिस्चार्ज प्लॅटफॉर्म करणार आहे. दुहेरी डिस्चार्ज प्लॅटफॉर्म सीएसएमटी आणि चर्चगेट प्रमाणे असून या प्लॅटफॉर्मवर प्रवासी दोन्ही बाजूंनी लोकलमध्ये चढू शकतात किंवा उतरु शकतात.

सध्या दादर स्थानकात लोकल वाहतूकीसाठी 5 प्लॅटफॉर्म आहेत. जलद लोकलच्या प्लॅटफॉर्मवर कधी कधी लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील धावतात. 10/11 दादर प्लॅटफॉर्मवर जलद गाड्या धावतात. प्लॅटफॉर्म क्रमांक 10वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल आणि मुंबईहून सुटणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या थांबतात. एकदा का दुसऱ्या बाजूचा प्लॅटफॉर्म प्रवाशांसाठी खुला झाला की दोन्ही बाजूने प्रवासी चढू शकतात. प्लॅटफॉर्म क्रमांक 9वर सीएसएमटी आणि परळकडे जाणाऱ्या धीमा लोकल थांबतात.

दादर स्थानकात जेव्हा प्लॅटफॉर्म 9 आणि 10 ला एकाच वेळी येतात तेव्हा प्रचंड गर्दी होते. त्यामुळं स्थानकात थोडे बदल करण्यात येणार आहे. प्लॅटफॉर्म 10-11च्या सुधारणेमुळं कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल आल्यानंतर दोन्ही प्लॅटफॉर्मवरुन चढता व उतरता येणार आहे. त्यामुळं फलाटावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. प्लॅटफॉर्म 11 आणि कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील धातूचे कुंपण काढण्यात येईल. तसंच, तिथल्या फुड स्टॉलदेखील हटवण्याचा विचार आहे.

सध्या फलाट क्रमांक 10 वरील फुटब्रिज, रॅम्प, कॅन्टीन आणि काही रेल्वे स्ट्रक्चर्स, जिने यासारखे काही काम सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यावर ओव्हरहेड वायर आणि ट्रॅक पुन्हा जोडले जाणार आहेत. या प्रकल्पाची आतापर्यंतची किंमत 1.88 कोटी रुपये इतकी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button