Ashadhi wari 2023 : विठ्ठल नामाची शाळा भरली… इंदापुरात पार पडलं दुसरं अश्व रिंगण
इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं अश्व रिंगण पार पडलं.
पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सोहळा इंदापूरमध्ये संपन्न झाला.
त्यासाठी या पालखीनं पहाटेच निमगाव केतकीतून प्रस्थान ठेवलं होतं
संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं सकाळी अकराच्या सुमारास इंदापूर गाठलं. इंदापुरात रयत शिक्षण संस्थेच्या कदम विद्यालय प्रांगणावर रांगोळ्या काढून तुकोबारायांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं.
तिथं मंडप उभारून रिंगणाची तयारी आधीच करण्यात आली होती.
तुकोबारायांच्या पालखीचा रथ मैदानात आल्यावर ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी टाळ्या वाजवून रथाचं स्वागत केलं. त्यानंतर रिंगणाला सुरुवात झाली.
सर्वात आधी सर्व दिंड्यांचे पताकाधारी वारकरी रिंगणात धावले. मग बेलवडीप्रमाणे इंदापुरातही पोलिसांना रिंगणात धावण्याचा मान मिळाला.
त्यानंतर डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी आनंदानं धावल्या. सर्वात शेवटी महाराजांचा अश्व आणि स्वाराच्या अश्वानं दौड घेऊन हा सोहळा आणखी नयनरम्य केला.