दिलासा देणारी बातमी. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करुन सर्वसामान्यांना आनंदाची बातमी दिली आहे. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) जाहीर केलेल्या किमतीनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 83 रुपयांनी कमी झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी आता 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी या सिलिंडरसाठी 1856.50 रुपये मोजावे लागत होते. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
जेट इंधनाच्या किमतीतही कपात
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये दिलासा देण्याबरोबरच जेट इंधनाच्या (एअर फ्युएल) किमतीतही तेल कंपन्यांनी कपात करण्यात आली आहे. किंमतीत सुमारे 6,600 रुपयांची घट झाली आहे. याचा परिणाम आगामी काळात विमान प्रवासावर होऊ शकतो. 1 जूनपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. यासाठी राजधानी दिल्लीत पूर्वीप्रमाणेच 1103 रुपये मोजावे लागतील.
व्यावसायिक गॅस सिलिंडरचे नवीन दर
1856.50 रुपयांवरुन 1773 रुपयांवर आले आहेत. कोलकातामध्ये पूर्वी 1960.50 रुपयांच्या तुलनेत आता 1875.50 रुपये मोजावे लागतील. त्याचप्रमाणे, पूर्वी ते मुंबईत 1808.50 रुपयांना उपलब्ध होते, जे आता 1725 रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये 2021.50 रुपयांवरुन किंमत 1937 रुपयांवर आली आहे.
ATF च्या किमतीत मोठी कपात
LPG व्यतिरिक्त तेल कंपन्यांनी देखील ATF च्या (Aviation Turbine Fuel) किमतीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचा दर 6600 रुपयांपर्यंत खाली आला आहे. दिल्लीतील ATF ची किंमत आधीच्या 95935.34 रुपयांवरुन 89,303.09 रुपयांवर आली आहे. यापूर्वी मुंबईत किंमत रु.89348.60 प्रति किलोलीटर होती, जी आता रु.83,413.96 प्रति किलोलीटर दराने उपलब्ध होईल. कोलकात्यात हा दर 95,963.95 रुपये प्रति किलोलीटर आणि चेन्नईमध्ये 93,041.33 रुपये प्रति किलोलिटर इतका खाली आला आहे.
एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) हे खास डिझाईन केलेल्या रिफ्युलर्समधून दिले जाते. जेट इंधन हे रंगहीन, ज्वलनशील, सरळ चालणारे पेट्रोलियम डिस्टिलेट द्रव आहे. जेट इंजिन इंधन म्हणून त्याचा मुख्य उपयोग आहे. जगभरातील सर्वात सामान्य जेट इंधन हे केरोसीन-आधारित इंधन आहे जे JET A-1 म्हणून वर्गीकृत आहे. भारतातील नियमन वैशिष्ट्ये IS 1571: 2018 आहेत.