
बॉलिवूडच्या जुन्या काळात एक असं नाव होतं, जे पडद्यावर दिसताच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटायचं. डगमगती चाल, डोळ्याकडून पाहूनच वाटावं की, दारु पिऊन आलाय. अडखळणारी वाणी हे सगळं त्यांच्या जबरदस्त अभिनयाचा भाग होतं. आपण बोलतोय केष्टो मुखर्जी यांच्याबद्दल, ज्यांना हिंदी सिनेमातला सर्वात प्रसिद्ध ‘दारूडा’ म्हटलं जायचं. पण खऱ्या आयुष्यात ते याच्या अगदी उलट होते – त्यांनी कधीही दारूला हात लावला नव्हता. उत्कृष्ट अभिनेते असण्याबरोबरच ते जबाबदार पती आणि वडीलही होते.
स्वत:च्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा कलाकार
7 ऑगस्ट 1925 रोजी कोलकात्यामध्ये जन्मलेले केष्टो मुखर्जी यांच्या आयुष्यात कुटुंबाचं स्थान सर्वात महत्त्वाचं होतं. चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर, त्यांचं घर आणि घरातील शांतता हेच त्यांचं खरं विश्व होतं. याचं एक खूप गोड उदाहरण त्यांच्या मुलाने – बबलू मुखर्जीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
केष्टो मुखर्जी राहत होते भाड्याच्या फ्लॅटमध्ये
केष्टो मुखर्जी मुंबईच्या जुहू भागात एका छोट्याशा फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्या पत्नीला टीव्ही बघायचा खूप शौक होता, पण त्याकाळी त्यांच्या घरी टीव्ही नव्हता. त्यामुळे त्या शेजाऱ्यांकडे जाऊन टीव्ही बघायच्या. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण एका दिवशी शेजाऱ्यांनी त्यांना घरात येऊ नका असं सांगितलं. यामुळे त्या खूप दुखावल्या.
पत्नीला दिलं वचन
ही गोष्ट केष्टो मुखर्जी यांना कळाल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी पत्नीला काहीही विचारलं नाही, फक्त एवढंच म्हणाले – “आता तुला कोणाच्या घरी टीव्ही बघायला जावं लागणार नाही.” काही आठवड्यांतच त्यांनी जुहूमध्ये दोन खोल्यांचा नवीन फ्लॅट विकत घेतला आणि त्याचसोबत नवीन टीव्हीही आणला. त्यांनी हे सुनिश्चित केलं की त्यांच्या पत्नीला पुन्हा कधीही त्रास होणार नाही. कुटुंबाचं सुख त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं.
अभिनयाची सुरुवात आणि लोकप्रियता
केष्टो मुखर्जी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांना सिनेसृष्टीत आणण्याचं श्रेय प्रसिद्ध दिग्दर्शक ऋत्विक घटक यांना जातं. 1957 मध्ये त्यांनी ‘नागरिक’ या चित्रपटात केष्टो यांना एक छोटंसं पात्र दिलं, जे त्यांच्या करिअरमध्ये महत्त्वाचं ठरलं. ही फिल्म प्रत्यक्षात 1977 मध्ये रिलीज झाली, पण त्याआधीच त्यांनी अभिनयात आपला ठसा उमठवायला सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी ऋषिकेश मुखर्जी यांचा ‘मुसाफिर’ हा चित्रपट केला, ज्यात त्यांनी स्ट्रीट डान्सरचं पात्र केलं. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती दारूच्या नशेत असलेल्या पात्रांमुळे.
दारूच्या पात्रांनी बदललं नशिब
त्यांनी पहिल्यांदा दारूडे पात्र साकारलं 1970 च्या ‘माँ और ममता’ या चित्रपटात. यात त्यांनी असित सेन यांच्या दिग्दर्शनाखाली जबरदस्त अभिनय केला होता. यानंतर दारूडे पात्रच त्यांची ओळख बनली आणि ते सतत अशा भूमिका साकारू लागले. त्यांच्या जबरदस्त विनोदी टाइमिंगमुळे ते हिंदी सिनेमातील महान विनोदी अभिनेत्यांपैकी एक बनले. त्यांनी ‘चुपके चुपके’, ‘गोलमाल’, ‘गुड्डी’, ‘शोले’, ‘पडोसन’, ‘बॉम्बे टू गोवा’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या उत्तम अभिनयासाठी त्यांना ‘फिल्मफेअर पुरस्कार’ही मिळाले.
अचानक झालेला दुःखद अंत
2 मार्च 1982 रोजी केष्टो मुखर्जी यांचं निधन झालं. ते फक्त 56 वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू एका दुर्दैवी रस्ते अपघातात झाला. जेव्हा ते मुंबईजवळील एका गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते, तेव्हा एका ट्रकने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.