देश

Rohit Pawar on Dadar Kabutar Khana: रोहित पवार तातडीने दादर कबुतरखान्यात जैनधर्मीयांच्या भेटीला, म्हणाले, ‘धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे’

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जैनधर्मीयांकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. दादर कबुतरखान्याच्या परिसरात झालेल्या आंदोलनात जैन समाजाने रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली होती. तसेच पालिकेने ज्या ताडपत्रीने कबुतरखाना (Kabutar Khana) झाकून ठेवला होता, ती ताडपत्री खेचून फाडण्यात आली. तब्बल तासभर आंदोलन केल्यानंतर धर्मगुरुंच्या आवाहनानंतर हा जमाव शांत झाला. यानंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) हे तातडीने दादरमध्ये जैनधर्मीयांच्या भेटीला गेले. त्यांनी कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिरात (Jain Mandir) आंदोलकांशी चर्चा केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी जैन समाजाची बाजू उचलून धरत महायुती सरकारवर टीकेची तोफ डागली.

इथे पक्ष्यांना अन्नदान केले जाते. येथील कोणीही कोर्टाच्या निर्णयाविरोधात नाही. फक्त पक्षी मेले नाही पाहिजेत, ही त्यांची भूमिका आहे. महानगरपालिकेने कबुतरखान्यासंदर्भात घाईगडबडीत निर्णय घेतला. काल मुख्यमंत्र्यांसोबत जैन समाजाची बैठक झाली. अधिवेशनात हा मुद्दा सत्तेतील आमदारांनी मांडला तेव्हा उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, आम्ही कबुतरखाने तातडीने बंद करुन टाकतो. पण हे कबुतरखाने बंद करताना डोकं वापरायला पाहिजे होतं. कशा पद्धतीने ते बंद करायला पाहिजेत, कशाप्रकारे झाकले पाहिजे, याचा विचार करायला हवा होता. त्या पक्ष्यांचं काय होणार, याचाही विचार पालिकेने करायला हवा होता. उच्च न्यायालयाने सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांच्याआधारे निर्णय दिला. आता पुन्हा कोर्ट या सगळ्याचा संवेदनशीलपणे विचार करेल, अशी मला आशा आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

मी येथील जैन बांधवांशी बोललो. त्यांनी सांगितले की, नायर, के.ई.एम रुग्णालयाचा अहवाल आला आहे. त्यामध्ये इथे असलेल्या कबुतरखान्यामुळे श्वसनाचे आणि इतर रोग होतात, याबाबत तपासणी करण्यात आली आहे. हा रिपोर्ट नकारात्मक आहे. कबुतरांमुळे या परिसरात रोगराई वाढलेली नाही, असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Rohit Pawar: धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे: रोहित पवार
जेव्हा जैन समाजबांधव एखादी भूमिका घेतात, त्यामागे कुठल्याही पक्ष्याला हानी होऊ नये, हा उद्देश असतो. त्यांच्यापर्यंत रस्त्यावर कबुतरं मरुन पडल्याचे व्हिडीओ पोहोचले. हे व्हिडीओ बघून त्यांचा जीव तडफडला आणि त्यांनी भावनिक होऊन आंदोलन केले. या भावनेला किंमत द्यायला हवी. धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button