जैन समाजाने दादरमधील कबुतरखाना पुन्हा सुरु केल्यानंतर राज्य सरकारकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ‘चुकीचं झालं, पण…’

दादरमधील कबुतरखाना बंद करण्याविरोधात जैन समाज रस्त्यावर उतरला असून आक्रमकपणे आंदोलन करत ताडपत्री फाडून टाकली आहे. तसंच पुन्हा एकदा कबुतरांना खाद्य टाकण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत त्यांचा विरोध डावलला. यानंतर परिस्थती तणावपूर्ण झाली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं असून, कबुतरं आज आलेली नाहीत, जसं आपल्याला कळत आहे तेव्हापासून ती होती ही वस्तुस्थिती नाकारु शकत नाही असं म्हटलं आहे. तसंच मंगप्रभात लोढा यांनी जे झालं ते चुकीचं झालं असं सांगितलं आहे.
आंदोलनाची माहिती मिळताच मंगलप्रभात लोढा कबुतरखाना येथे पोहोचले होते. “जे काही झालं ते चुकीचं झालं. मुख्यमंत्री फडणवीसांनी काल बैठकीत सर्वांचं ऐकून योग्य निर्देश दिले होते. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. लोकांच्या आरोग्याला धोका होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे. ज्यांनी हे आंदोलन केलं त्यांना भेटणार नाही. शांतता ठेवण्याचं माझं सर्वांना आवाहन असून, कायदा हातात घेऊ नये. सरकारचं याकडे लक्ष आहे. उद्या सुनावणी असून, कोर्ट काय निर्णय देईपर्यंत संयम राखा”.
“मी काल बैठकीत होतो. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण वेळ देत, सर्वांचं ऐकून घेतल्यानंतर निर्देश दिले. आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि कबुतरंही मरायला नको असं सांगत त्यांनी यावर मार्ग काढायला हवा असं सांगितलं होतं. त्यांनी पालिकेला योग्य प्लॅन तयार करुन कोर्टात सादर करण्यास सांगितलं आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.
अजित पवारांनीही दिली प्रतिक्रिया
“देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला मी, मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबकर यांच्यासह दादर कबुरतखाना संबंधित संघटनेचे सदस्य होते. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मुंबई पालिकेला कोर्टाने निर्देश दिले असल्याने गगराणी यांनाही बोलावलं होतं. कबुतरांचं खाणं बंद करणं, कुठे कुठे हलवता येईल यासंदर्भातही चर्चा झाली. मोकळ्या जागा जिथे नागरिकांचा संबंध नाही त्यांसदर्भातही चर्चा झाली. जसा नागरिकांना राहण्याचा अधिकारे आहे तसा पक्षांनाही त्यांच्या परिसरात जगण्याचा निसर्गाने अधिकार दिला आहे. जैन समाजाच्या आणि इतर मान्यवरांच्या भूमिका तीव्र होत्या. हायकोर्टात ही स्थिती पुन्हा लक्षात आणून द्यायची आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं आहे.
अखेरीस न्यायव्यवस्था सर्वोच्च
“मुंबईतील परिसरात अनेक कबुतरखाने आहेत. ते अनेक वर्षांपासून आहे. कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार उद्भवतात असं काहींचं म्हणणं आहे. अखेरीस न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे. पण जनतेच्या मनात काय आहे हेदेखील महत्त्वाचं आहे. जसं माधुरीच्या संदर्भातही बैठक झाली. कोल्हापुरातील लोकांनी शांततेने मोर्चा काढला. मंत्री, आमदार त्यात सहभागी झाले होते. त्यांनी जनतेच्या भावनेचा आदर करण्याची भूमिक मांडली आहे. तशी ती चर्चा झाली तशीच यासंदर्भातही चर्चा झाली. सरकार याबाबत सकारात्मक मार्ग निघावा अशाच विचाराचं आहे असं मुख्यमत्र्यांनी सांगितंल आहे,” अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
“काल त्यांनी फार तीव्रतेने भूमिका मांडली होती. जसा आपल्याला आहे तसा कबुतरांनाही खाण्याचा अधिकार आहे. ताडपत्री टाकल्याने कबुतरं मरत आहेत, त्यांना तिथे खायला मिळत नाही. त्यांनी वर्षानुवर्षं तिथे खाण्याची सवय लागली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. कोर्टाने मात्र मुंबई महापालिकेला कडक आदेश दिले आणि त्यानुसार कारवाई कऱण्यात आली. कायदा सुव्यस्थेचं काम पोलिसांचं आहे आणि ते केलं जात आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.
मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले. “हा मतांचा प्रश्न नाही, याच्यात राजकारण आणण्याचं कारण नाही. आपण माणुसकी जपत असतो. पक्षी प्राण्यांवर प्रेम दाखवण आपली परंपरा आहे”.
“आजार उद्भवतात की नाही याचाही तपास करा असंही काहींनी सांगितलं आहे. वेगवेगळ्या रुग्णालयात जाऊन तपासा. करोना काळात सगळं करोनामुळेच घडत नव्हतं. तशीही काल चर्चा झाली. मोठ्या रुग्णालयांचं मतही विचारलं पाहिजे. कबुतरं आज आलेली नाहीत, जस आपल्याला कळत आहे तेव्हापासू नती होती ही वस्तुस्थिती नाकारु शकत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.