Pranjal Khewalkar : ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्राजंल खेवलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खडसे यांना ड्रग्ज पार्टी प्रकरणी 14 दिवसांची न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळली आणि आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे प्रांजल खेवलकरांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या आधी दोन महिलांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता उर्वरित पाच आरोपींनाही न्यायालीयन कोठडी सुनावण्यात आल्याने या सर्वांना जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे पोलिसांची मागणी फेटाळली
प्रांजल खेवलकर यांच्या फोनमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडीओ आणि चॅट सापडल्याची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. प्रांजल खेवलकर याने एका मुलीचे व्हिडीओ दुसऱ्या आरोपीला पाठवत ‘ऐसा माल चाहिए’ असा मेसेज केला आहे. या सर्व प्रकरणाचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
ड्रग्ज प्रकरणाची इनसाईड स्टोरी
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यात ड्रग्ज पार्टीत अटक झाली. आता या प्रकरणाची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. पार्टी करण्याची हौस असलेल्या प्रांजल खेवलकरांच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी हे दोघे आले. या दोघांचीही पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे .
श्रीपाद यादववर या आधी बेटींग प्रकरणात गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटक देखील झाली आहे. तर निखिल पोपटाणी हा सिगारेटचा व्यवसाय करत असला तरी तो देखील बेटींगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो.
या दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि ते प्रांजल खेवलकर यांच्या सर्कलचा भाग बनले. शनिवारी देखील हे दोघे पार्टीत सहभागी झाले. यातील श्रीपाद यादवच्या सांगण्यावरुन दोन महिला तिथे आल्या आणि त्यापैकी एकीच्या पर्समधे अंमली पदार्थ सापडले.
खेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न, रोहिणी खडसेंचा आरोप
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे वकील विजयसिंह ठोंबरेही उपस्थित होते. ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांच्या वकिलांनी केला. रक्ताच्या चाचणीचे अहवाल लवकरात लवकर मिळावे अशी मागणी त्यांनी कलीय. पार्टीत उपस्थित मुलींशी खेवलकर यांचा काहीही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं.
प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती आणि फोटो खडसेंच्या विरोधी आमदाराकडे गेल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. त्यासाठी रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकरांचे वकील पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन चौकशीची मागणी करणारे पत्रही दिले.