Kolhapur News: अंबानींचं वनतारा जिंकलं, कोल्हापूरकर हरले; कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणीला नांदणीकरांचा भावपूर्ण निरोप, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे रडले

कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वनताराकडे जाण्यासाठी रवाना झाली आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर महादेवी हत्तीणीला भावपूर्ण निरोप देताना नांदणीकरांचा अक्षरशः अश्रूच्या बांध फुटला आहे. हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भावूक झाले आहे. या हत्तीणीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली. दरम्यान नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला एकीकडे निरोप दिला जात होता, तर दुसरीकडे काही हुल्लडबाज तरूणांनी गोंधळ घातला. मिरवणुकीदरम्यान काही जणांनी गोंधळ घालत पोलिसांच्या गाडीची काच फोडली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
मागील 33 वर्षांपासून महादेवी हत्तीणीचा मठात सांभाळ
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळलीये, त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे जाणार आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयामुळे नांदणी ग्रामस्थ मात्र नाराज झालेत. कोल्हापुरातील नांदणी इथला मठ जैन धर्मियांच्या श्रद्धेचं ठिकाण मानलं जातो. या मठात मागील 33 वर्षांपासून महादेवी नावाची हत्तीणीचा सांभाळ करण्यात आलाय. मात्र याच हत्तीणीला गुजरातच्या वनतारा अभय़ारण्यात नेण्यात येणार आहे. हत्तीणीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्याचे हायकोर्टानं दिल्यानंतर नांदणी ग्रामस्थांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं होतं, मात्र तिथही त्यांना निराशा मिळालीय.
का वाद निर्माण झाला?
महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ‘पेटा’ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं.
33 वर्षांची नाळ कायमची तुटली, गुजरातच्या वनताराकडे जाण्यासाठी रवाना
दरम्यान, Reliance Foundation च्या माध्यमातून स्थापित Vantara Wildlife Rescue & Rehabilitation Centre हे जगातील सर्वात मोठे प्राणी काळजी केंद्र मानले जाते. 3,500 एकर भूभागात पसरलेले हे केंद्र 3,300 प्रजातींतील सुमारे 10,000 प्राण्यांचे निवारा घर आहे, ज्यामध्ये व्याघ्र, मगर, अजगर, न्यूमथुन आणि हत्तीही समाविष्ट आहेत. 26 फेब्रुवारी 2024 रोजी प्रारंभ झालेल्या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2025 रोजी केले, तेथे त्यांनी MRI, CT‑scan, हायड्रोगीक मसाज, हात्त्यांसाठी हायड्रोथेरपी अशा आधुनिक सुविधा निरीक्षण केले आणि हात्ती, चिंपांझी, काराकल व इतर दुर्लभ प्रजातींसह संवाद साधला होता.