Shaktipeeth Expressway: चंदगड विधानसभा मतदारसंघांमधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा यासाठी सात बारा हातात घेऊन पदयात्रा

शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून व्हावा म्हणून शेतकरी आपले सात बारा उतारे घेऊन महामार्ग समर्थनासाठी काढलेल्या पदयात्रेत सहभागी झाले. गडहिंग्लज शहरात ही पदयात्रा काढण्यात आली. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या मतदारसंघांमधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा यासाठी प्रशासनाला पत्र दिलं होतं. यानंतर चारच दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन झाले. मात्र, आज हजारो शेतकरी आपले सातबारा उतारे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघांमधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा अशी मागणी करण्यात आली. आमदार शिवाजी पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यावेळी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शिवाजी पाटील यांनी जोरदार टीका केली. आंदोलन करणारे नेते मॅनेज होणारे आहेत, त्यांना दुसरं आता काही काम नाही म्हणून चांगल्या प्रकल्पाला विरोध करत आहेत, अशी टीका देखील शिवाजी पाटील यांनी केली.
जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांनीच सात बारा दिले
दरम्यान, मुंबईत दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांनीच सात बारा दिले असून 1 टक्काही लोकांचे शक्तीपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत माणगावमधील 6 लोक घेऊन गेले होते. मात्र त्यातील 3 लोकांचीच जमीन संपादित केली जाणार आहे, उर्वरीत तीन लोक भुजगावणे म्हणूनच घेऊन गेले होते, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला. ते म्हणाले की, राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठकीत घेतली. या बैठकीत 35 लोकांनी सात बारा शासनाकडे जमीन संपादनास दिले असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 3822 गटधारकांची जवळपास 5300 एकर संपादित केली जाणार असून या गटामध्ये 10 हजारहून अधिक शेतकरी समाविष्ट आहेत. यामुळे गटधारकांच्या 1 टक्काही लोकांचे या महामार्गास संमती नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. यामुळे राज्य सरकार शक्तीपीठ समर्थनासाठी जो खटाटोप करत आहे त्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. ज्यापध्दतीने कोल्हापूरची करवीर निवासनी अंबाबाई देवीने कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आता कोल्हापुर शहरातील जनतेला पुराच्या खाईत लोटणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग रूपी राक्षसापासून कोल्हापूरच्या जनतेचे रक्षण आई अंबाबाईच करेल.