पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना मृत दाखवून लाटलं 7 लाखांचं अनुदान; बांधकाम कामगार योजनेत मोठा भ्रष्टाचार

पतीने पत्नीला तर मुलानं वडिलांना बोगस कागदपत्रांच्या आधारे मृत दाखवून बांधकाम कामगार योजनेतून 7 लाखांचं अनुदान लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे .जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आकणी गावात हा प्रकार घडला आहे. बांधकाम कामगार योजनेत जिवंत व्यक्तींना मृत दाखवून बोगस कागदपत्रांच्या आधारे अनुदान लाटले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते नारायण पवार यांनी जिल्हाधिकारी आणि कामगार मंत्र्यांकडे केली होती. त्यांनंतर हे गौडबंगाल उघडकीस आले आहे.
दलालांमार्फत बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार करून लाभ घेणाऱ्या आरोपींमध्ये शिवाजी उबाळे,तेजस जाधव आणि एका महिलेचा समावेश आहे. या प्रकरणात आरोपी शिवाजी लक्ष्मण उबाळे यांनी त्यांच्या पत्नी स्वाती शिवाजी उबाळे यांना मयत दाखवलं तर तेजस दुर्योधन जाधव याने त्याचे वडील दुर्योधन जाधव यांना मृत दाखवून 7 लाखांचं अनुदान हडपलं.त्यामुळे पोलिसांनी या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. विशेष म्हणजे दलालांमार्फत बोगस मृत्यू प्रमाणपत्र तयार करून हे अनुदान लाटण्यात आल्याचं पोलीस चौकशीत समोर आल आहे.
ज्या कामगारांची कामगार कल्याण कार्यालयाकडे नोंदणी आहे.त्या कामगाराचा नैसर्गिक अथवा कामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 2 लाखांचं अर्थसहाय्य मिळतं.कामगार पुरुष असेल तर त्याच्या पत्नीला 24 हजारांची मदत मिळते.याच मिळणाऱ्या अर्थसहाय्याचा आरोपींनी बोगस कागदपात्रांच्या आधाराचा फायदा घेतला. जालन्यातील बांधकाम कामगार कार्यालयाला दलालांनी विळखा घातला असून बांधकाम आयुक्तांनी दलालामार्फत घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केला.
जालन्यात बांधकाम कामगार कार्यालयात 100 कोटींचा घोटाळा झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी वाघमारे यांनी केली. जालन्यातील बांधकाम काम गार कल्याण मंडळात हजारो बोगस कामगाराची दलालांनी नोंदणी केल्याचा आरोप आहे.त्यामुळे दलालांनी केलेल्या या कृत्याचा कामगार मंत्रालयाकडून पर्दाफाश होणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.