टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, 57 व्या मजल्यावरुन उडी घेतली, कारण फारच धक्कादायक

मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पश्चिम उपनगरातील कांदिवली येथे उच्चभ्रू वस्तीत एका तरुणाने 57 व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेला तरुण हा एका टीव्हा अभिनेत्रीचा मुलगा आहे. बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजराती मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री कांदिवली येथील सीब्रूक इमारतीत तिच्या कुटुंबासह राहत होती. बुधवारी तिने मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितले. मात्र मुलाला क्लासला जायचे नव्हते. त्यावरुन माय-लेकात वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या मुलाने इमारतीच्या 57व्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली.
उंचीवरुन पडल्यामुळं मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिनेत्रीचा हा एकुलता एक मुलगा असल्याचं बोललं जातंय. मुलाने इतकं टोकाचे पाऊल उचलल्यामुळं कुटुंबीयांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात येत आहे. मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यू असल्यानी नोंद केली आहे. मात्र आत्महत्यामागे नेमके हेच कारण आहे का, याची पुष्टी अद्याप झालेली नाहीये. पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलाला कोणी उडी मारताना पाहिलं का, याचा शोध पोलिस घेत आहेत. तसंच, तिथे आणखी कोणी उपस्थित होतं का? याचा देखील शोध घेण्यात येत आहे. इमारतीचे सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. पोलिस सर्व अनुषंगाने या घटनेची चौकशी करत असून आता पोलीस पुढे काय कारवाई करतात, यावर सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.