ओला, Uber चं भाडं दुपट्टीने वाढलं! मोदी सरकारच्या निर्णयचा सर्वमान्यांना मोठा फटका

ओला, उबर, रॅपिडोसारख्या ‘अॅप’वर आधारित टॅक्सी कॅब सेवा पुरवठादार कंपन्यांना गर्दीच्या वेळी प्रवाशांकडून मूळ भाड्याच्या दुप्पट भाडे आकारण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. यापूर्वी या कंपन्यांना दीडपट भाडे आकारण्याची मुभा होती. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार असून या सेवा वापरण्यासाठी खिसा अधिक रिकामा करावा लागणार आहे.
मंत्रालयाने नेमकं काय म्हटलं आहे?
परिवहन मंत्रालयाने सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्य सरकारने संबंधित वाहनांसाठी किंवा त्या श्रेणीतील वाहनांसाठी नेमून दिलेले भाडे हे मूळ भाडे असेल आणि गर्दीच्या वेळी कॅब सेवा पुरवठादार कंपन्यांना या मूळ भाड्याच्या दुप्पट भाडे आकारण्याची परवानगी असेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. टॅक्सी सेवा पुरवठादारांना मूळ भाड्यापेक्षा किमान 50 टक्के कमी आणि उप-कलम (17.1) अंतर्गत ठरवून दिलेल्या मूळ भाड्याच्या दुप्पट किंमत आकारण्याची परवानगी असेल.
डेड मायलेजचेही पैसे द्यावे लागणार
‘डेड मायलेज’ भरून काढण्यासाठी किमान तीन किलोमीटरचे मूळ भाडे आकारले जाईल. त्यामध्ये प्रवाशाशिवाय प्रवास केलेले अंतर आणि प्रवाशांना ते असलेल्या ठिकाणाहून स्वीकारण्यासाठी वापरलेले इंधन यांचा समावेश असेल. या सुधारित मार्गदर्शक सूचना राज्यांनी तीन महिन्यांत स्वीकाराव्यात, असे सरकारने म्हटले आहे. त्यामुळेच आता पुढील तीन महिन्यात ओला, उबरची सेवा अधिक महागणार हे जवळपास निश्चित आहे.
प्रमुख मार्गदर्शक सूचना
सेवा पुरवठादार कंपन्यांनी वैध कारणाशिवाय वाहनसेवा रद्द केल्यास चालकाला भाड्याच्या 10 टक्के दंड
वैध कारणाशिवाय भाडे रद्द केल्यास प्रवाशालाही असाच दंड
वाहनचालकांचा अनुक्रमे किमान पाच लाख आणि 10 लाख रुपयांचा आरोग्य आणि मुदत विमा
दिवसोंदिवस मागणीत वाढ अन् वाद
ओला, उबर, रॅपिडोसारख्या ‘अॅप’वर आधारित टॅक्सी कॅब सेवेची मागणी मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र त्यामुळेच ओला, उबर, रॅपिडोसारख्या ‘अॅप’वर आधारित टॅक्सी कॅब सेवा चालक आणि काळी-पिवळी टॅक्सी तसेच रिक्षा चालकांमध्ये अनेकदा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अनेक ठिकाणी पारंपारिक रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना या ‘अॅप’वर आधारित टॅक्सी तसेच वाहनांना मौक्याच्या ठिकाणी प्रतिबंध घातल्याचंही दिसून येतं. अनेक ग्राहकांकडून या ‘अॅप’वर आधारित टॅक्सी सेवा पुरणाऱ्यांकडून ग्राहकांची लूट होत असल्याचेही आरोप केले जातात. मात्र असं असलं तरी या सेवेची लोकप्रियता कमी झालेली नसून दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे.