इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, धोकादायक लहान पूल पाडण्यात येणार

पुणे जिल्ह्यातील मावळमधील कुंडमळ्याजवळ रविवार पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा मोठा अपघात घडला. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना (Indrayani Kundmala bridge collapse) घडली. यामध्ये चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर 50 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही पूल दुर्घटना घडली. दरम्यान, इंद्रायणी नदीवरील कुंडमळा दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील धोकादायक लहान पूल पाडण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
धोकादायक झालेले लहान पूल काढण्याचा निर्णय
पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्या जोडणारे धोकादायक झालेले लहान पूल काढण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी केलेल्या ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र गुड्डी यांनी दिल्या आहेत. या संदर्भातली बैठक दोन दिवसात होण्याची शक्यता आहे. मावळ येथील इंदुरी कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पादचारी फुल रविवारी कोसळला. त्यामुळे जिल्ह्यातील धोकादायक लोखंडी पादचारी फुल गावी वस्त्यांना जोडणाऱ्या छोट्या मुलांच्या सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
एकाच वेळी 100 ते 150 पर्यटक पुलावर आल्याने पूल कोसळला
रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. 100 ते 150 पर्यटक पुलावर उभे होते. त्याचवेळी पूल मधोमध तुटून कोसळला, आणि अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आरडाओरडा, घबराटीचे वातावरण निर्माण झाले. काही स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखून पाण्यात उड्या टाकून काही पर्यटकांचे प्राण वाचवले. तत्काळ तळेगाव पोलीस, अग्निशमन दल, वन विभाग, बचाव पथके व स्वयंसेवी संस्था घटनास्थळी दाखल झाल्या आणि मदतकार्य सुरू केले. घटनास्थळावर नागरिकांची गर्दी झाली होती. रविवारी रात्री उशिरापर्यंत NDRF व स्थानिक बचाव पथकांकडून बचावकार्य सुरू होते. सोमवारी सकाळपासून ड्रोनच्या मदतीने नदीपात्रात अडकलेल्यांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत चार मृतदेह हाती लागले असून, एकूण 51 जण जखमी असल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत तीन जणांना वाचवले, तर एक जण बचावपथकांनी बाहेर काढला. दरम्यान, इंद्रायणी नदीवरील पूल अतिशय जीर्ण झालेला होता. त्याच पुलावर पर्यटक समूहाने फोटो काढत होते. नदीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्याचा प्रयत्न पर्यटकांचा होता. मात्र पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल कोसळला.