मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; रविवारी मध्य, हार्बर रेल्वेवर लोकल फेऱ्यांमध्ये बदल होणार

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळं या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्यांमध्ये बदल होणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहार आणि ‘सीएसएमटी’ ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर कसा असेल मेगाब्लॉक
सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग: अप आणि डाऊन धीमा
वेळ : स. 10.55 ते दु. 3.55
परिणाम : ब्लॉकवेळेत अप, डाऊन
धीम्या लोकल अप, डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरवरून पुन्हा अप-डाऊन धीम्या मार्गावर धावतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही २० मिनिटे विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक
सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : स. 11.40 ते दु. 4.40
परिणाम : सीएसएमटी/वडाळा ते
वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल रद्द राहणार आहेत. हार्बरवरील प्रवाशांसाठी पनवेल ते कुर्त्यावरून (फलाट क्रमांक ८) विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
मुंबई-गांधीधाम विशेष फेऱ्या
प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते गांधीधाम विशेष तेजस सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या 10 साप्ताहिक फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 09017 मुंबई सेंट्रल ते गांधीधाम मुंबईहून रात्री 11.20 वाजता सुटेल आणि गांधीधाम येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12.55 वाजता पोहोचेल. 2 जून ते 30 जूनदरम्यान दर सोमवारी ही विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक 09018 गांधीधाम-मुंबई सेंट्रल ही गाडी 3 जून ते 1 जुलैदरम्यान दर मंगळवारी
धावणार आहे.
विशेष गाडी गांधीधामवरून सायंकाळी 6.55 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता पोहोचेल. विशेष गाडीला प्रथम वातानुकूलित, द्वितीय वातानुकूलित, तृतीय वातानुकूलित असे डबे असणार आहेत. विशेष गाडीचे आरक्षण खुले झाले असून, अधिक माहितीसाठी पश्चिम रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्या.