देश

इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहर आणि मनपा हद्दीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरुच आहे. आज भरदिवसा तीन भटक्या कुत्र्यांनी चिमुरडीवर प्राणघातक हल्ला केला. केवळ दैव बलवत्तर म्हणून चिमुरडी कुत्र्यांच्या हल्ल्यात बचावली आहे. मात्र, डोक्याला आणि डोळ्याला चावा घेत गंभीर जखमी केलं आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून चिमुरडीचा आरडाओरडा ऐकून एक तरुण धावत बाहेर आल्यानंतर त्याने कुत्र्यांना हुसकावून लावत चिमुरडीची सुटका केली. संबंधित चिमुकलीवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजीमधीलव्यंकटेश कॉलनीत हा प्रकार घडला. 

इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच 

भटक्या कुत्र्यांनी केलेला हल्ला एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा झाला आहे. यापूर्वी सायकलवरून जात असणाऱ्या विद्यार्थिनीच्या पाठीमागं भटकी कुत्री लागली होती. भेदरलेल्या विद्यार्थिनीनं सायकलवरून वेगाने जाताना बेसमेंटमध्ये दहा ते पंधरा फुटांवरून खाली कोसळली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामध्ये विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. नंदिनी विजय वाइंगडे असे जखमी झालेल्‍या विद्यार्थिनीचे नाव आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, इचलकरंजीमधील मराठी मिल चौकात सायकलवरून नंदिनी क्लासला जात होती.  त्यावेळी पाठीमागे भटकी कुत्री लागली. भटकी कुत्री पाठीमागे लागल्‍याने घाबरलेली विद्यार्थीनी वेगाने सायकल चालवत चौकातून वळली. तेवढ्यात सायकलवरील नियंत्रण सुटून ती सायकलवरून उडून इमारतीच्या बेसमेंटमध्ये पडली. 

इचलकरंजीसह कोल्हापूर शहरामध्येही भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड असून अनेकजण या भटक्या कुत्र्यांची शिकार झाली आहेत. वाहन चालकांचे अनेक अपघात भटक्या कुत्र्यांमुळे होत आहेत. इचलकरंजीमध्ये गेल्या अडीच वर्षात वर्षात दोन हजारांहून अधिक कुत्र्याने चाव्या घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर उघड्यावर चायनीज हातगाड्या, चिकन 65 तसेच कचरा कोंड्याळ्याने भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे त्याचा फटका पादचाऱ्यांपासून ते लहान मुलं ते वाहनचालकांना होत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button