मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; काय आहेत वेळा, कसं आहे बदललेलं वेळापत्रक

रविवारी सुट्टीच्या दिवसाचं निमित्त साधत जर फेरफटका मारण्यासाठी किंवा कुठेही भटकंतीला निघण्यासाठी लोकल ट्रेननं प्रवासाचा बेत आखणार असाल तर आधी रेल्वेच्या बदललेल्या वेळापत्रकावर लक्ष द्या. रविवार 25 मे 2025 रोजी मुंबई लोकल मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात असल्यामुळं त्याचा थेट परिणाम शहरातील रेल्वे वाहतुकीवर होणार असून मुंबईकरांचा मोठा खोळंबा होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील उपनगरीय विभागांत काही अभियांत्रिकी आणि देखभाल कामांच्या कारणास्तव रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी 11 ते दुपारी 3.55 दरम्यानच्या वेळेत हा ब्लॉक घेतला जाणार असून, माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकलसेवा प्रभावित होणार आहे.
ब्लॉक कालावधीत (CSMT) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी 10.14 ते दुपारी 3.52 दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत या लोकल या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तर, पुढे मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत या लोकल साधारण 15 मिनिटं उशिरानं धावतील, ज्यामुळं प्रवाशांना अनेक अडचणींचा आणि गर्दीचाही सामना करावा लागू शकतो
ठाण्यावरून कशी असेल प्रवासाची सोय?
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार ठाण्याहून सकाळी 11.7 ते दुपारी 3.51 दरम्यान धावणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंडला अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड – माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवर त्यांना थांबा असेल. नंतर पुन्हा या लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकलसुद्धा 15 मिनिटं उशिरानं असल्यामुळं प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
हार्बर रेल्वेवरील प्रवाशांचासुद्धा खोळंबा
शहरातील ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ब्लॉक घेतला जाणार असून, यादरम्यान वाशी / नेरुळ ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहील. काही लोकल रद्द करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील माहितीसुद्धा रेल्वेनं सुधारित वेळापत्रकामध्ये जारी केली आहे.