
साताऱ्यातील (Satara) संगम माहुली या ठिकाणी एक कलाकार पाण्यात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. अभिनेते रितेश देशमुख (Rietesh deshmukh) यांच्या राजा शिव छत्रपती या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या संगम माहुली या ठिकाणी सुरू आहे. या चित्रपटाचे दिवसभरातील शूटिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपटात काम करणारा एक कलाकार कृष्णा नदीत (River) बुडाला आहे. सौरभ शर्मा असे या कलाकाराचे नाव असून तो डान्सर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान, सौरभ पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ समोर आला असून त्याला पोहायला येत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
कृष्णा नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्याचा डोहात हा कलाकार बुडाला आहे. चित्रकरण करणाऱ्या टीमकडून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सौरभचा शोध घेण्यात आला. मात्र, अंधार पडल्याने शोधमोहिमेत अडथळा निर्माण होत होता. अखेर, अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सातारा पोलीस दाखल झाले आहेत. उद्या सकाळपासून पुन्हा संगमावर सौरभ शर्माचा शोध सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संबधितांकडून देण्यात आली.
रितेशचा फर्स्ट लूक आला समोर
दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणून त्याचा दुसरा मराठी चित्रपट ‘राजा शिवाजी’ घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. त्याचा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार असून या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना त्याने साइन केलं आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, ‘इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज… हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही 350 वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे… प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.’ सध्या या सिनेमाचे चित्रीकरण वेगाने सुरू असून सर्वांनाच सिनेमाची उत्सुकता आहे.