महाराष्ट्रातील 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 500 रुपयेच मिळणार, सरकारचा मोठा निर्णय!

लोकसभा निवडणुकीत फटका पडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणली. याअंतर्हत पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकीत सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. राज्यातील महिला 2100 रुपये कधी मिळणार या प्रतिक्षेत असताना लाडकी बहीण योजनेतील 8 लाख महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी अपडेट दिली आहे. यामुळे 8 लाख लाभार्थी महिलांना धक्का बसणार आहे. कारण या अपडेटनुसार 8 लाख महिलांचे मासिक स्टायपेंड कमी करण्यात आले आहे. यानंतर महिलांमध्ये चिंतेचे वातवरण असून विरोधकांनी संताप व्यक्त करत सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळतोय. राज्यातील अशा महिलांची आकडेवारी साधारण 8 लाख इतकी आहे. अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपयांऐवजी 500 रुपये मासिक मिळणार आहेत.
नमो शेतकरी योजनेतून 1 हजार रुपये मिळत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल. पण त्यांचा एकूण मासिक लाभ 1 हजार 500 रुपयांपर्यंत मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा महिलांना सरसकट लाभ देण्यात आला होता. यात पात्र, अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या महिलांनी अर्ज केले. पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या महिलांची कागदपत्र पडताळणी केली. यातून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेच्या लाभातून वगळले. आता पात्र व्यक्तींनाच स्टायपेंड मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये या योजनेसाठी 2.63 कोटी अर्ज आले होते. तपासणी प्रक्रियेनंतर ही संख्या 11 लाखांनी कमी झाली. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत 2.52 कोटी महिला लाभार्थ्यांना योजनेचे पैसे मिळाले. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अंतिम स्टायपेंड 2.46 लाख लाभार्थ्यांना देण्यात आला. यातूनही आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना 1500 रुपयाऐंवजी फक्त 1000 रुपये मिळणार आहेत.
लाडकी बहीण निधी कपातींवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. लाडक्या बहिणींचा निधी आता 500 रुपयांवर आलाय,
त्यांच्या मतांची किंमत हळूहळू शून्यावर येईल असे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. बहिणींना 500 रुपये देणाऱ्या सरकारची कीव येतेय. -केंद्राचे पैसे मिळतात म्हणून निधी कमी करणे हे चूक असल्याचं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी घणाघात केलाय.