देश

Sangli Crime : साडी लटकवली आणि… सांगलीच्या माजी महापौरांचा जीव देण्याचा प्रयत्न, थोडक्यात बचावले

 सांगलीचे माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल, सोमवारी सकाळी नेमिनाथनगगर येथील निवासस्थानी गळफास घेऊन त्यांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने येथील उषःकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्यांचा जीव वाचला असून प्रकृती स्थिर आहे.

सुरेश पाटील यांच्यावर उषःकाल रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे. या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या दप्तरी करण्यात आली आहे. मात्र सुरेश पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न का केला, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सांगलीच्या राजकारण, समाजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार क्षेत्रातील एक प्रमुख चेहरा असलेल्या सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने सांगलीकरांना धक्का बसला. काही कारणाने गेल्या वर्षभरापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून थोडे अलिप्त झाले होते. त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या सूरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला त्यांनी गेल्या रविवारी हजेरी लावली होती.

काल सकाळी त्यांनी निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. रात्री उशीरा रुग्णालय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत.

लातूर मनपा आयुक्तांचं टोकाचं पाऊल

याआधी, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना अत्याधुनिक उपचारासाठी सोमवारी विशेष विमानाने मुंबईला हलविण्यात आले. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. हणुमंत किनीकर यांनी दिली.

बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री स्वतःच्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, रक्ताचे नमुने, पिस्तुल ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button