
आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. पहिला सामना हा 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. तर आयपीएलमधील मोठी रायव्हलरी असणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यातील आयपीएल 2025 चा पहिला सामना हा 23 मार्च रोजी चिन्नस्वामी स्टेडियमवर होईल. मात्र यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Superkings) यांच्यात 23 मार्च रोजी होणाऱ्या सामन्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ऐवजी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. हार्दिक पंड्याने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्वतः याची घोषणा केली आहे.
हार्दिक पंड्यावर एका सामन्याचा बॅन :
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला करत हार्दिक पंड्याकडे संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स चांगली कामगिरी करू शकली नाही आणि स्पर्धेच्या पॉईंट्स टेबलमध्ये ते सर्वात शेवटच्या स्थानी राहिली. आयपीएल 2024 मध्ये मुंबईने स्पर्धेतील शेवटचा सामना हा लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध त्यांचं होम ग्राउंड असणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला होता. या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंवर मॅच फी कपातची कारवाई करण्यात आली आणि एका सीजनमध्ये तिसऱ्यांदा ही चूक झाल्याने कर्णधार असलेल्या हार्दिक पंड्याला एका सामन्यासाठी बॅन करण्यात आलं. मुंबई प्लेऑफसाठी क्वालिफाय करू शकली नाही त्यामुळे लखनऊ विरुद्ध सामना हा त्यांच्यासाठी शेवटचा ठरला.
मुंबई इंडियन्सने पत्रकार परिषदेत केली घोषणा :
हार्दिक पंड्यावर लागलेला बॅन हा आयपीएल 2025 मध्ये एक्सटेन्ड करण्यात आला ज्यामुळे यंदाच्या सीजनमधील पहिल्या सामन्यात हार्दिक खेळू शकणार नाही. आयपीएल 2025 मधील पहिला सामना मुंबई इंडियन्स चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध खेळणार आहे. त्यामुळे हार्दिकच्या अनुपस्थितीत कोणता खेळाडू चेन्नई विरुद्ध मुंबईचं नेतृत्व करेल अशी चर्चा रंगली होती. एका सामन्यासाठी रोहित शर्माला मुंबई इंडियन्स कर्णधारपदाची जबाबदारी देईल अशी शक्यता होती. परंतु बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्सच्या पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्या आणि महेला जयवर्धने यांनी चेन्नई विरुद्ध पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव हा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करेल अशी घोषणा केली. तर उर्वरित सर्व सामन्यांसाठी हार्दिक पंड्या हाच मुंबईचा कर्णधार असेल.
टीम इंडियाचा टी 20 कर्णधार :
रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यावर आता सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाच्या टी 20 संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत सर्व टी 20 सीरिज जिंकल्या असून कर्णधार म्हणून सूर्या यशस्वी ठरलाय. सूर्यकुमार यादवने आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सुद्धा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं आहे. यासह सूर्या मागील अनेक वर्षांपासून मुंबई संघाचा स्टार फलंदाज आहे.