देश

मुंबईत पाणीबाणी! फेब्रुवारीतच धरणातील जलसाठा निम्म्यावर; पाऊस येईपर्यंत काय असेल अवस्था?

सहसा एप्रिल आणि मे महिना उजाडला, की मुंबईसह अनेक भागांमध्येच पाणीकपातीचं सावट पाहायला मिळतं. पण, यंदाच्या वर्षी मात्र हे संकट काहीसं नव्हे तर बरंच आधी घोंगावण्यास सुरुवात झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश धरणांतील पाणीसाठा आता निम्म्यावर आला आहे. ज्यामुळं फेब्रुवारीतच ही स्थिती असताना आता ऐन मे महिन्यात पाणीसंकट नेमकं आणखी किती भीषण होणार? हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सध्याच्या घडीला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये असणारा पाणीसाठा हा पुढील तीन ते चार महिने पुरेल इतकाच आहे. सातत्यानं होणारं बाष्पीभवन या पाणी तुटवड्यास कारणीभूत असून, उन्हाळ्यात पाण्याची वाढती मागणी पाहता आता थेट जून, जुलै महिन्यापर्यंत हा पाणीसाठा टीकवण्याचं आवाहन पालिकेपुढं उभं ठाकलं आहे. 

चांगला पाऊस पडूनही ही अवस्था का? 

2024 या वर्षात  बहुतांश धरण प्रवण क्षेत्रांमध्ये चांगल्या पर्जन्यमानानंतर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा समाधानकारक पातळीपलिकडे पोहोचला होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी तानसा, भातसा, मोडकसागर, तुळशी, विहार, उर्ध्व वैतरणा, मध्य वैतरणा या धरणांमधील पाणी पातळी 90 टक्क्यांपलिकडे पोहोचली होती. असं असलं तरीही यंदाचा उष्णतेचा दाह पाहता हा उकाडा वाढल्यास पाण्याची मागणी वाढेल आणि इथं मागणीत वाढ, तिथं सातत्यानं होणारं बाष्पीभवन या दोन्ही कारणांमुळं पाणीसाठ्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

कोणत्या धरणात सध्या किती पाणीसाठा? 

मोडकसागर- 19.91 टक्के 
तानसा- 43.35 टक्के 
मध्य वैतरणा- 50.98 टक्के 
भातसा- 51.78 टक्के 
तुळशी- 56.12 टक्के 
विहार- 59.03 टक्के 
उर्ध्व वैतरणा- 70.67 टक्के

वस्तूस्थिती पाहायची झाल्यास सध्याच्या घडीला धरणांमध्ये असणारा पाणीसाठा हा पुरण्याजोगा असला तरीही तापमानाचा आकडा आणखी वाढल्यास मात्र कमी दाबानं होणारा पाणीपुरवठा, पाणीकपात अशा संकटांचासामना मुंबईकरांना करावा लागणार हे नाकारत येत नाही. ऋतूचक्रानुसार जून महिन्यापासून पावसाळा सुरू असला तरीही प्रत्यक्षात मात्र धरणांमध्ये जुलै महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू होतो. ज्यामुळं सध्या उपलब्ध असणारा साठा हा जुलै महिन्यापर्यंत टीकवावा लागणार असल्यानं पालिका प्रशासनही सतर्क झालं आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button