‘नीलम गोऱ्हेंना 4 टर्म आमदारकी मिळाली, त्यांनी 2 मर्सिडीज…’; गंभीर आरोपांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

दिल्लीत झालेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी गंभीर आरोप केला. साहित्य संमेलनाच्या मंचावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असं वक्तव्य करून त्यांनी नवीन वादाला तोंड फोडलं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनीही गोऱ्हेंच्या आरोपावर भाष्य केलंय. नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही पण ते योग्य झाले नाही, त्यांनी केलेले विधान हे अयोग्य आहे, असे शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते म्हणाली की, नीलम गोऱ्हे यांनी जे भाष्य साहित्य संमेलनात केलं त्याची काही आवश्यकता नव्हती. नीलम गोऱ्हे यांना चारवेळा आमदारकी मिळाली आहे. त्यांना या चारही टर्म कशा मिळाल्या या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांनी मला वाटतं कुठल्याश्या कारचा उल्लेख केला तो करायला नको होता. नीलम गोऱ्हे यांनी असं बोलायला नको होतं. नीलम गोऱ्हे या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होत्या. त्यानंतर त्या शिवसेनेत होत्या, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात त्या काम करत होत्या. त्यानंतर आता त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काम करत आहेत. एका मर्यादित कालावधीत त्या जवळपास चार पक्षांचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यांचा जो काही अनुभव पाहता त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य नाही. दरम्यान साहित्य संमेलनातील पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणात माफी मागितली आहे. त्यामुळे यावर पडदा पडायला हवा.
संजय राऊतांचा आरोपवर…
दरम्यान खासदार संजय राऊत यांनीही नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांना जबाबदार धरलं होतं. या सर्व आरोपांना शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेतून उत्तर दिलंय. साहित्य संमेलन असल्यावर वादविवाद होतात. त्यात नीलम गोऱ्हे यांनी ते भाष्य त्या व्यासपीठावरुन करणं गरजेचं नव्हतं. या प्रकरणावर संजय राऊत हे शंभर टक्के बरोबर बोलले. मात्र, या व्यासपीठाचा राजकीय वापर होतो हा आरोप मला मान्य नसल्याचं शरद पवार स्पष्टच सांगितले. तरदुसरीकडे महादजी शिंदे पुरस्कार वितरणावरुनही शरद पवार यांनी संजय राऊतांना टोला मारल्याचं पाहिला मिळाले.