मुंबईत ताज ग्रुपचं आणखी एक भव्य-दिव्य फाईव्हस्टार हॉटेल; CM फडणवीसांना रतन टाटांची आठवण

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील ताज हॉटेल Hotel) हे भारत देशाचं आयकॉनिक असून विदेशी पर्यटक उतरण्याचं आवडतं ठिकाण आहे. त्यासोबतच, देशभरातून मुंबई फिरायला येणाऱ्या पर्यटकांचंही ते आवडतं ठिकाण असून ताज हॉटेलबाहेर फोटो काढणं हेही अनेकांचं स्वप्न असतं. या हॉटेलबाहेर दररोज हजारो पर्यटक फोटो काढून आनंद व्यक्त करतात. टाटा ग्रुपच्या या हॉटेलबद्दल प्रत्येक भारतीयला आपुलकीचा भावना आहे, त्यातच उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीचं ते हॉटेल असल्याने तोही वेगळाच जिव्हाळा भारतीयांना या हॉटेलबाबत आहे. आता मुंबईची (Mumbai) शान असलेल्या ताज हॉटेलं आणखी एक दुसरं हॉटेल मुंबईत नव्याने बांधलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याहस्ते आज मुंबईतील वांद्रे परिसरात या नव्या हॉटेलचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी भाषण करताना मुख्यमंत्र्यांना दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांची आठवण झाली.
भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी इंडियन हॉटेल कंपनीचे आभार मानतो, मुंबईतील वांद्रे परिसरात इतक्या सुंदर हॉटेलची उभारणी ते करत आहेत. हे हॉटेल रतन टाटा यांच्या जवळ होते, त्यांनी एकदा हॉटेल उभारणीत काही अडचणी येत आहेत, यासंदर्भात मला देखील सांगितलं होतं. या नव्या हॉटेलच्या प्लॅनिंग आणि डिझाईनमुळे मुंबईच्या सुंदरतेत आणखी भर पडेल. ताज ग्रुपचा महाराष्ट्रात चांगले प्रस्थ आहे, पण ताज ग्रुपचं नागपुरात हॉटेल नाही, माझी इच्छा आहे तुम्ही आजच नगापुरात हॉटेल सुरू करण्याची घोषणा करावी, माझी टाटा ग्रुपचे सीईओ यांना विनंती असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ताज बँडस्टँड हॉटेल’च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी म्हटलं.
टाटांच्या ताज ग्रुपचं हे हॉटेल 21 व्या शतकातील मोन्युमेंट म्हणून समोर येईल असा मला विश्वास आहे. ताज ग्रुपने हॉस्पिटॅलिटीची व्याख्या बदलली आहे. जगभरातील अनेक देशात ताज ग्रुपचं प्रस्त आहे, तिथं असं वाटतं आपण मुंबई किंवा देशात आहोत. ‘भारत=ताज’ असं परदेशात गेल्यावर वाटतं. या हॉटेलच्या उभारणीसंदर्भात मुंबई पालिकेनं अडचणी सोडवल्या आहेत. पण, स्व. रतन टाटा यांच्या जाण्याआधी हे उभं राहिलं किंवा भूमिपूजन झालं असतं तर त्यांना अधिक आनंद झाला असता, असे म्हणत फडणवीसांनी याप्रसंगी रतन टाटा यांची आठवण जागवली. तसेच, कदाचित आम्ही पण त्यातील समस्या सोडवण्यात कमी पडलो, यापुढे प्रकल्प उभारणीसंदर्भात काही अडचणी आल्या तर आम्ही पाठीमागे उभं राहू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुंबईत आणखी हॉटेल्स उभारा
दरम्यान, विकासासाठी सरकार म्हणून आम्ही एकप्रकारे पार्टनर आहोत, मुंबईला आणखी अशा हॉटेलची अपेक्षा आहे. तुम्ही अजून काही हॉटेल्सची उभारणी करावी असं आवाहन मी तुम्हाला करतो. मला तुम्ही सहभागी करुन घेतलं यासंदर्भात मी आभारी आहे, असेही फडणवीसांनी यावेळी म्हटले.