लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! योजनेचा पुढील हफ्ता कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतून दिली Good News

महायुती सरकारने आपल्या मागील काळातील अंतरिम अर्थसंकल्पादरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. खूप कमी वेळातच ती योजना लोकप्रिय झाली. याचा काहीसा परिणाम मतपेटीवर देखील पाहायला मिळाला आहे. ज्यामुळे महायुतीला पुन्हा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरु झाली. जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे हफ्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता महायुती सरकारच्या नव्या कार्यकाळात पुढील हफ्ता कधी जमा होणार? किती पैसे जमा होणार? याबद्दल बहिणींना उत्सुकता लागली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेतील गुरुवारच्या सत्रात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. फडणवीस म्हणाले, आमची एकही योजना बंद होणार नाही आहे. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. अधिवेशन संपतात सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत. तर पुढे फडणवीसांनी अर्जदारांनाही आश्वासित केले आहे. ‘आम्ही जी आश्वासने दिली, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. याबद्दल कुणीही शंका ठेऊ नये. योजनेच्या कोणत्याही निकषात बदल करण्यात आलेले नाहीत. ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना पैसे देणार आहोत.’ असेही फडणवीसांनी नमूद केले.
लाडक्या बहिणींना २१०० मिळणार की १५००?
महायुतील निवडणुकीच्या जाहीनाम्यात बहिणींना २१०० देण्याचं आश्वासन दिलं होतं. तर आता लाडक्या बहिणींचा पुढील हफ्ता २१०० चा असेल की १५०० चा याकडे बहिणींचे लक्ष लागले आहे. यावर फडणवीस म्हणाले, बहिणींना अर्थसंकल्पानंतर २१०० मिळू शकतील. डिसेंबरच्या हप्त्यामध्ये मात्र आधीप्रमाणेच १५०० रुपये मिळणार आहेत.