महाकाय लोखंडी होर्डिंगमुळे लोअर परळवासियांचा जीव टांगणीला, आदित्य ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतरही पालिका ढिम्मच
मुंबईतल्या घाटकोपरमधील पेट्रोलपंपवर 16 मे रोजी होर्डिंग पडल्याची घटना समोर आली आणि संपूर्ण मुंबई हादरली. 120 बाय 120 फूट इतके मोठे होर्डिंग कोसळले आणि त्याखाली चिरडून 16 जणांचा मृत्यू झाला होता तर 75 जण जखमी झाले होते. या प्रकरणानंतर मुंबई शहरातील मोठमोठे होर्डिंग पाडण्यात आल्याचे, बेकायदेशीर होर्डिंग्सवर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले. पण प्रत्यक्षात असे घडताना दिसत नाहीय. मुंबईतील काही ठिकाणचे भलेमोठे होर्डिंग उतरले नसल्याचे दिसून येत आहे. अशाच एका महाकाय होर्डिंगच्या लोखंडी ढाच्यामुळे लोअर परळकरांचा जीव टांगणीला लागलाय. विशेष म्हणजे वारंवार तक्रार करुनही पालिकेला जाग येत नाहीय. या प्रकरणात आता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनींही हस्तक्षेप केलाय.
स्थानिकांचा सुरुवातीपासूनच विरोध
लोअर परळमधील सेनापती बापट रोडवरील खिमजी नागजी चाळ क्र. 2 मधील शेकडो रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगताय. मुंबईत घाटकोप होर्डिंग दुर्घटना ताजी असताना आपल्यावरही असे संकट कधीही ओढवू शकते, याची भीती रहिवाशांच्या मनात आहे. विशेष म्हणजे नागरिकांनी यासंदर्भात पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या. पण हे होर्डिंग काही काढले जात नाही. हे होर्डिंग साधारण 60 फुटांपेक्षाही जास्त उंचीचे आहे. या होर्डिंगच्या उभारणीपासूनच स्थानिकांनी विरोध केला होता. पण त्यांना जुमानण्यात आले नाही. नागरिकांनी यासंदर्भात पालिकेकडे पत्रव्यवहार केला पण त्यावरही फारशी काही कार्यवाही होताना दिसत नाही. या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी लक्ष घातलंय. असे असतानाही पालिका प्रशासन ढिम्मच असल्याच ढिम्मच असून ढाचा काढला जात नसल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून येतेय. त्यामुळे यामागे कोणाचा वरदहस्त आहे? असा प्रश्न विचारला जातोय. लोखंडी ढाचा खाली न उतरवून मुंबई पालिका घाटकोपरच्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट पाहतेय का? असा प्रश्नदेखील विचारला जातोय.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
शेजारीच जनता कंपाऊंडच्या मालकाद्वारे महाकाय लोखंडी होर्डिंग उभारण्यात आले आहे. हे होर्डिंग 60 फूट पेक्षा अधिक उंच आहे. नुकतीच घाटकोपर, कल्याण येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटना आणि त्यामध्ये झालेली जीवितहानी लक्षात घेता; येथील रहिवासी भीतीच्या छायेत राहत आहेत. आपण ह्यासंदर्भात महापालिका आयुक्त भूषण गगरानी जी ह्यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्या महाकाय होर्डिंगवरील जाहिरात काढून टाकण्यात आली मात्र हा लोखंडी ढाचा अजूनही तसाच आहे. यामुळे भविष्यात होणारी हानी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा धोकादायक लोखंडी ढाचा लवकरात लवकर हटवण्यात यावा. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.