मतदान होताच सर्वसामान्यांना महागाईच्या तडाखा! मध्यरात्रीपासून इंधनदरवाढ लागू; पाहा आजचे नवे दर

महाराष्ट्राबरोबरच झारखंडमधील निवडणूक पार पडल्यानंतर सर्वसामान्यांच्या खिशाला भगदाड पाडणारी बातमी समोर आली आहे. 20 नोव्हेंबर रोजी झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात तर महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात मतदान पूर्ण झाल्यानंतर 24 तासांमध्ये इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून गॅसचे दर वाढले आहेत. मात्र हे घरगुती स्वयंपाक गॅसचे दर नसून सीएनजीच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा गॅस विक्री करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या महानगर गॅस लिमिटेडने केली आहे.
किती रुपयांनी महाग झाला गॅस?
महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली आहे. आजपासून सीएनजी गॅस प्रति किलोमागे 2 रुपयांनी वाढला आहे. या दरवाढीमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये सीएनजीचे दर 77 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. नवीन दर आजपासूनच लागू झाले आहेत. सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याने सीएनजी वाहन मालकांबरोबर रिक्षाचालकांच्या खिशाला खड्डा पडणार आहे.
शेअर बाजारामध्ये शेअर्सवरही परिणाम
सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाल्याची बातमी समोर आल्यानंतर दुसरीकडे शेअर बाजारामध्ये महानगर गॅसच्या शेअर्समध्ये मोठी हलचाल दिसून आली आहे. महानगर गॅसच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. महानगर गॅसचा शेअर आज सकाळपासूनच 1160 रुपयांच्या रेंजमध्ये दिसत आहे. नुकतेच सरकारने घरगुती बाजरपेठेतील गॅस पुरवठ्यामध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली. सरकारने या निर्णयानंतर एमजीएल गॅसच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
सलग दुसऱ्या महिन्यात…
सरकारने सलग दुसऱ्या महिन्यामध्ये शहरातील गॅस वितरक कंपन्यांसाठी अॅडमिनिस्टर्ड प्राइज मेकॅनिझम अॅलोकेशनमध्ये 20 टक्क्यांची कपात केली आहे. असं मानलं जात आहे की यामुळेच एमजीएल आणि आयजीएलसारख्या कंपन्यांच्या नफ्यामध्ये थेट परिणाम दिसून येत आहे. असं मानलं जात आहे की सीएनजीची किंमत 2 रुपयांनी झालेली वाढ ही 2.6 टक्क्यांची आहे. एपीएम अॅलोकेशनमध्ये कपात केल्याने तूट भरुन काढण्यासाठी किंमत 8 ते 10 टक्क्यांनी वाढवणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळात आयजीएल म्हणजेच इंद्रप्रस्त गॅस लिमिटेडकडूनही गॅसच्या दरांमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता अधिक आहे.