देश

मृत्यूच्या बातम्यांसंदर्भात बोलताना जरांगेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, ‘सरकार आणि..’

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. पत्रकारांशी बोलताना जरांगे-पाटलांना त्यांच्या मत्यूसंदर्भातील बातम्या व्हायरल होत असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारलाही घातपात व्हावं असं वाटत असल्याचा गंभीर दावा केला आहे.

सरकारवर जरांगेंचे गंभीर आरोप
जरांगेच्या मृत्यूच्या बातम्या व्हायरल होत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता जरांगेंनी राज्यात सत्तेत असलेल्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा आंदोलनाबाबत सरकारला काही देणंघेणं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. “कोणी मला मारुन टाकीन म्हणतंय, कोणी म्हणतंय त्याला गोळ्या घालीन. कोणी काहीही लिहितं. मागे तर असं लिहिलं होतं, त्याला मारुन टाकू. कचाट्यात सापडू दे. सोशल मीडियावर कोणी काहीही लिहितं. सरकार, पोलीसही मराठ्यांविरोधात असल्यासारखे वागतात. त्यांच्या हातात आहे सारं. ते अशा गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. सरकारलाही, पोलिसांनाही वाटत असेल घातपात झाला पाहिजे,” असं जरांगे-पाटील म्हणाले.

मराठ्यांचं वाटोळं झालं पाहिजे अशी सरकारची इच्छा
पोलीस तसेच सरकार इतर प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करतं मात्र मराठ्यांसंदर्भातील प्रकरणांमध्ये एवढी तत्परता दाखवली जात नाही असं जरांगे-पाटील म्हणाले. “दुसऱ्यांच थोडं काही झालं की लगेच कारवाई करतात पोलीस. सरकार असो, गृहमंत्री असो किंवा पोलीस असो ताबडतोब कारवाई करायला लावतात. इथे इथे पोस्ट पडली, कारवाई करा, संरक्षण पुरवा असं सगळं करतात. इथं मराठ्यांना मेलेलं दाखवू द्या. आम्हाला कोणी मारुन टाकायचं म्हणू द्या. त्यांना आमच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. मराठ्यांचं वाटोळं झालं पाहिजे. आरक्षणात लक्ष देत नाही. मराठ्यांना धमक्या दिल्या जातात त्यात लक्ष देत नाहीत. पण मी घाबरत नाही. फक्त तू ये समोर मी सांगतो तुला,” असं जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.

सर्व मराठा एकत्र येतील
“मराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील मराठे एकत्र येतील. आम्हाला आरक्षणच नाही. तुम्हाला (ओबीसींना) आरक्षण असून तुम्ही आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून एवढं लढत आहात तर मिळावं म्हणून आम्ही चौपट लढू,” असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला आहे. “कोणत्या पक्षाचा नेता असो जे मदत करणार नाही त्यांना उघडं पाडल्याशिवाय मराठा राहणार नाही,” असा इशारा जरांगे पाटलांनी सर्व राजकारण्यांना दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button