कोकणसह विदर्भात आज मुसळधार पावसाचा यलो अलर्ट, तर इतर ठिकाणी…..हवामान विभागाचा अंदाज काय?

हवामान विभागानं (IMD) दिेलेल्या अंदाजानुसार आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain)कोसळणार आहे. अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात कोकणासह (konkan) विदर्भात (Vidharbha) मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर इतरही काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. तर काही ठिकाणी अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या मान्सून राज्यात सक्रिय झाला आहे. विदर्भातील काही भागात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. पुढच्या दोन ते तीन दिवसात मान्सून संपूर्ण विदर्भात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस?
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातीस पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातीस नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील. या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबईत हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
चांगला पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी
दरम्यान, ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागात शेती कामांना वेग आला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, अनेक भागात चांगला पाऊस झाला नाही, त्या भागातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 100 मिलीमीटर पााऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करु नये, चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.