देश

Tomato Price Hike : 20 रुपयांच्या टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल !

पेट्रोल-डिझेल नंतर आता टोमॅटोचा भाव सुद्धा 100 रुपयांच्यावर गेला आहे. टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे. भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबीच्या दरातही वाढ झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाल्याने ही दरवाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भाज्यांच्या दरात आणि टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत 20 रुपये किलोने उपलब्ध असलेल्या टोमॅटोचा भाव आता 100 रुपयांवर पोहोचला आहे. मान्सून सुरु होताच दिल्लीतील जनतेला महागाईचा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात 20 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता 100 रुपये किलोने विकला जात आहे. याशिवाय भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबी यासह अनेक भाज्यांचे भाव चांगलेच वधारले आहेत.

दिल्लीतील आझादपूर सब्जी मंडईच्या भाजी व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे की, पावसामुळे अनेक राज्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. याचा परिणाम हिरव्या भाज्यांच्या दरावर झाला आहे. दिल्लीतील मंडईंमध्ये सर्वाधिक टोमॅटो हिमाचल प्रदेशातून येत असतात. परंतु तेथे केवळ 60 टक्केच पीक वाया गेले आहे. बेंगळुरुमध्ये टोमॅटोचे पीक संपले आहे. परिणामी, भाव गगनाला भिडले आहेत.

गेल्या महिन्यात 300 रुपये प्रति कॅरेट (25 किलो) असलेले टोमॅटो आता मंडईमध्ये 1200 ते 1400 रुपये प्रति कॅरेटने उपलब्ध आहेत. याशिवाय सिमला मिरची, फ्लॉवर, मुळा, बटाटा, करवंद यासह अनेक भाज्यांचे भाव वाढले आहेत. पावसामुळे येत्या काही दिवसांत भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या टोमॅटो 100 रुपये किलोने विकला जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून या दरात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात टोमॅटो 20 रुपये किलोने विकले जात होते. सिमला मिरची 80 रुपये किलोने विकली जात आहे. गेल्या महिन्यात सिमला मिरचीचा भाव 40 रुपये होता. याशिवाय फ्लॉवर, बटाटे यासह सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत.

बाजारात सध्याचे भाज्यांचे भाव
टोमॅटो : 100 रुपये किलो
फुलकोबी : 160 रुपये प्रति किलो
सिमला मिरची : 80 रुपये प्रति किलो
झुचीनी: 60 रुपये प्रति किलो
बटाटा: 25 रुपये किलो
कांदा : 30 ते 35 रुपये किलो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button