मान्सून केरळात दाखल; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभाग म्हणते…
मान्सूनची (Monsoon) प्रतीक्षा आज अखेर संपली आहे. केरळात मान्सून दाखल झाला असल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. जवळपास एक आठवडा उशिराने मान्सून यंदा केरळात (Kerla) दाखल झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून कधी दाखल होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र, मान्सूनसाठी अजूनही नागरिकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
एरवी मान्सून १ जूनपर्यंत केरळात दाखल होतो. मात्र यंदा मान्सून तब्बल एक आठवडा उशीराने केरळात दाखल झाला आहे. केरळाच्या बहुतांश भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. मान्सूनला विलंब झाल्याने महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाची थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळं नागरिक हैराण झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा हवामान विभागाने काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांनी उशीरा पेरणी करण्याचे अवाहन केले होते. मात्र, आता मान्सून दाखल झाल्याने शेतकऱ्यांसह, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
11 व 12 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता होती. मात्र आता महाराष्ट्राच्या किनारी भागात तसेच पश्चिम महाराष्ट्रात मान्सून थोडा उशिराने दाखल होणार आहे. तर जून महिन्यात महराष्ट्रात जवळपास मध्य महाराष्ट्रात 20 टक्के पाऊस कमी पडणार आहे. तर यावर्षी साधारण पाऊस होणार अशी, माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय
16 जूनपर्यंत तळकोकणात मान्सून दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, अरबी समुद्रात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळं मान्सून पुन्हा लांबणार का?,असा प्रश्न उपस्थित होत आहे. 8 ते 13 जून या कालावधीत समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पेरणीची घाई करु नका
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नका, असं अवाहन कृषी विभागाने केले आहे. 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. कारण पुरेशा खोलीवर ओलावा जातो. त्यामुळे पावसाचा खंड पडल्यास हि पीके तग धरू शकते नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास पावसाच्या खंड काळात पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी असे आवाहन लातूरच्या कृषी विभागाने केलं आहे.