देश

Pandharpur News : विठुरायाच्या पगारी सेवेसाठी अखेर मिळाला पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी, तब्बल वीस महिन्यानंतर शोध पूर्ण

अखेर विठ्ठल मंदिराच्या (Vitthal Temple) कार्यकारी अधिकारी पदाचा शोध संपला असून राजेंद्र शेळके या उपजिल्हाधिकाऱ्याने देवाची सेवा करण्यास संमती दाखवल्यावर शासनाने शेळके यांची विठ्ठल मंदिराचा कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नांदेड येथील धर्माबाद येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या शेळके यांनी विठ्ठल मंदिरात पूर्णवेळ कार्यकारी अधिकारी म्हणून काम करण्यास संमती दाखवल्याने शासनाने त्यांची मंदिर समितीवर कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

राजेंद्र शेळके लवकरच रुजू होणार

विठुरायाच्या दर्शनासाठी वर्षभरातील देशभरातून लाखो भाविक येथे येत असतात. दुर्दैवाने मंदिर समितीचा कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर येण्यासाठी मात्र गेल्या अनेक महिन्यापासून एकही अधिकारी पुढे यायला तयार नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले होते. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती ही विधी व न्याय विभागाकडे असून यासाठी प्रत्येक वेळी महसूल विभागाकडे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर पाठवावे लागते. गेल्या अनेक महिन्यांपासून हे पद रिक्त होते. त्यामुळे वारंवार पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्याकडे याचा पदभार दिला जात होता. यापूर्वी 9 सप्टेंबर 2021 रोजी तत्कालीन कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांच्या प्रतिनियुक्तीचा दोन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर मंदिर समितीला नियमित कार्यकारी अधिकारी मिळालेलाच नव्हता. आता तब्बल 20 महिन्यानंतर विठुरायाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी राजेंद्र शेळके लवकरच रुजू होणार असून येत्या आषाढी यात्रेत त्यांना खूप काही शिकायला मिळेल.

20 महिन्यांनंतर शोध पूर्ण
उपजिल्हाधिकाऱ्यांना फील्डवर अथवा मोक्याच्या जागांवर काम करण्यात जेवढे स्वारस्य असते तेवढे विठ्ठल मंदिरात येऊन पूर्णवेळ काम करायला नसते. यातच शासनाच्या नियमानुसार एखाद्या अधिकाऱ्याला प्रतिनियुक्तीवर पाठवायचे असेल तर त्यासाठी या अधिकाऱ्याची विनंती अथवा संमती आवश्यक असते. त्यामुळेच सामान्य प्रशासन विभागाला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर कार्यकारी नियुक्तीसाठी वारंवार विनंती पत्रे काढली होती. आता 20 महिन्यांनंतर हा शोध पूर्ण झाला आहे.

सध्या राज्यातील शिंदे सरकारने विठ्ठल मंदिर विकास प्रकल्प या 73 कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. हा महत्त्वाकांक्षी आराखडा व्यवस्थित राबवण्यासाठी शासनाला याठिकाणी पूर्णवेळ उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी मंदिराचा कार्यकारी अधिकारी म्हणून पाहिजे होता. यातच विठ्ठल मंदिरातील अनेक प्रश्न प्रलंबित असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नेमलेली शिवसेना भाजपच्या समितीची मुदत संपून 2 वर्षे झाली तरी अजून नवीन समिती अस्तित्वात आली नव्हती. मंदिरातील प्रशासन संपूर्णपणे कोलमडून गेल्याने पूर्णवेळ कार्यकारी अधिकाऱ्याची गरज होती. पूर्णवेळ अधिकारी नसल्याने कर्मचाऱ्यांची मग्रुरीचे अनेक प्रसंग वारंवार येत असून गैरप्रकाराचे देखील अनेक आरोप होत असतात. यात सध्या पदभार असणाऱ्या तुषार ठोंबरे या अधिकाऱ्याने मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करुन कर्मचाऱ्यांना चाप लावण्याचा प्रयत्न केला होता. मंदिराला शिस्त लावून भाविकांच्या गैरसोयी दूर करणे, भाविकांच्या विकासाच्या योजनांना गती देणे आणि 73 कोटीच्या मंदिर विकास आराखड्याची सुरुवात करणे ही प्रमुख आव्हाने नवीन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या समोर असणार आहेत. येत्या चार दिवसात शेळके हे आपला पदभार स्वीकारतील अशी माहिती मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button