देश

ठाण्यांतील पोलिस करतात काय? बेकायदा धंद्यांविरोधात सामाजिक सुरक्षा विभाग सक्रिय, १५ ठिकाणी कारवाई

शहरात ‘स्ट्रीट क्राइम’च्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील बेकायदा धंद्यांवर कारवाईसाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे संबंधित ठाण्यांमधील पोलिस नेमके करतात काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने गेल्या तीन महिन्यांत १५ बेकायदा धंद्यांवर कारवाई केली आहे.

शहरात बेकायदा धंद्यांना ऊत खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, जबरी चोरी, घरफोडी, मोबाइल, सोनसाखळी हिसकावणे आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांनी शहरात उच्छाद मांडला असून, चोरांना अटकाव करण्यात किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. दुसरीकडे पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदा धंदे राजरोसपणे आणि उजळ माथ्याने सुरू असल्याचे दिसून येते. या धंद्यांकडे स्थानिक पोलिसांचा काणा डोळा होत आहे. त्यामुळे पोलिस ठाणी, चौक्यांपासून काही अंतरावर चालणाऱ्या बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्यासाठी सामाजिक सुरक्षा विभागाला धाव घ्यावी लागते.

दररोज सुमारे चार तक्रारी

सामाजिक सुरक्षा विभागाने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पोलिस ठाण्यांपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या २० ठिकाणच्या बेकायदा धंद्यांवर कारवाई केली आहे. काही अपवाद वगळता बहुतांश पोलिस ठाण्यांतील यंत्रणांकडून बेकायदा धंद्यांना मोकळीक दिल्याचे दिसून येते. आपल्या आजूबाजूला बेकायदा धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यावर काही सजग नागरिक पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती कळवतात. त्यासंबंधी दररोज साधारणतः दोन ते चार तक्रारी प्राप्त होतात.

तक्रारींची ‘सरकारी’ दखल

तक्रारींची माहिती नियंत्रण कक्षातून संबंधित पोलिस ठाण्यांना दिली जाते. मात्र, पोलिसांकडून अशा धंद्यांवर कारवाई करण्यात कुचराई होत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश कॉलबाबत ‘सदरील ठिकाणी बेकायदा प्रकार आढळून आला नाही,’ असे मोघम आणि सरकारी उत्तर दिले जाते. ही वस्तुस्थिती असेल, तर नियंत्रण कक्षाला कॉल देणाऱ्या नागरिकांना जाब विचारण्याचीही तसदी पोलिसांकडून घेतली जात नाही.

‘सामाजिक’ची कारवाई जुगारापुरती ?

सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक कारवाई जुगार अड्यांवर झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. त्यापाठोपाठ मसाज सेंटर, स्पाच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय आणि हुक्का पार्लरवरील कारवाईचा समावेश आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षा विभागाच्या रडारवर केवळ जुगार अड्डे असल्याचे कारवाईतून दिसून येते.

सामाजिक सुरक्षा विभागासह पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना आपापल्या हद्दीतील बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर प्राधान्याने कार्यवाही केली जाईल.- अमोल झेंडे, उपायुक्त, गुन्हे शाखा

नेमकी कारवाई कुठे?

सिंहगड रस्ता, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, कोरेगाव पार्क, लोणीकंद, लोणी काळभोर, वारजे, चंदननगर, उत्तमनगर, मुंढवा, विश्रामबाग, दत्तवाडी, बंडगार्डन, कोंढवा आणि हडपसर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील बेकायदा धंद्यांवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली आहे…

कारवाई कशावर?

■ घरगुती वापराच्या सिलिंडरमध्ये अवैधरीत्या गॅस भरून विक्री.
■ जुगार अड्डड्यांवर छापे
■ मसाज सेंटर, स्पामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार.
■ मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावणाऱ्यांवर कारवाई.
■ वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर छापा. ■ बेकायदा हुक्का पार्लरवर छापा.

नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या तक्रारी (तीन एप्रिल २०२३)
पोलिस ठाणे

स्वारगेट
स्वारगेट
चतुःशृंगी
खडकी
खडक
वारजे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button