Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Birthday) यांचा आज 84 वा वाढदिवस आहे. यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. त्यातच आता शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले (Hemant Takle) यांनी केले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांसोबत 40 आमदार गेल्याने राष्ट्रवादी मोठी बंडखोरी झाली. यानंतर शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबीय पहिल्यांदा आमने-सामने आल्याचे दिसून आले. विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठा फटका बसला. यानंतर शरद पवार-अजित पवार हे पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्यातच आज अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा देखील झाली.
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, मधल्या काळात त्यांच्या फायद्यासाठी सगळे शरद पवार यांना सोडून गेले. तरी शरद पवार मागे हटले नाहीत. त्यांनी दुःख दाबून ठेवले आणि लोकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले. संविधान वाचवायचे असेल, न्याय व्यवस्था टिकवायची असेल तर शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी एकत्र यायला हवे, असे हेमंत टकले यांनी म्हटले आहे. आता काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार का? शरद पवार त्यांची राजकीय भूमिका बदलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.