indiaदेश

“२०१९ मध्येच भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर…” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले, “आम्ही कुठे…”

“आपली युती झालेली होती, मग त्यावेळी नकार देऊन मला मुख्यमंत्री व्हायला कशाला भाग पाडले?,” असा प्रश्नही ठाकरेंनी भाजपाला विचारला होता.

भाजपाने शिवसेनेमधील बंडखोर गटाला समर्थन देत बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांपूर्वी युतीमध्ये मतभेद निर्माण होण्याआधीच हे केलं असतं तर अधिक चांगलं झालं असं म्हणत खंत व्यक्त केलीय. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही अडीच वर्षांपूर्वी याच मुद्द्यावरुन शिवसेना भाजपामध्ये मतभेद झाल्याचं म्हटलंय. मात्र शिवसेनेकडून आता अडीच वर्षांपूर्वीच्या मागणीचा उल्लेख होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर भाष्य केलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर धक्कादायक राजकीय घटनाक्रमांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे, असा दावाही शिंदे-फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना, राज्यात नवे सरकार आल्यावर तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री म्हणून भाजपला पाठिंबा द्यावा लागला ते पाहता २०१९ मध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे या अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील प्रस्तावाची अंमलबजावणी झाली असती तर आज ही वेळ आली नसती असं म्हटलं.

“त्यावेळी ऐकले असते तर आज हेच सारे सन्मानाने झाले असते. लोकसभा-विधानसभेसाठी युती होत असताना हेच ठरले होते. आपली युती झालेली होती, मग त्यावेळी नकार देऊन मला मुख्यमंत्री व्हायला कशाला भाग पाडले?,” असा प्रश्नही ठाकरेंनी भाजपाला विचारला. “भाजपाने आमचे ऐकले असते तर महाविकास आघाडी स्थापनही झाली नसती आणि अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री राहिला असता. आता तर पाचही वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री नाही, असे सध्याचे चित्र आहे. आमचे ऐकले असते तर अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता. या साऱ्यात भाजपला काय आनंद मिळाला समजत नाही,” असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

उद्धव यांनी अडीच वर्षांचा मुद्दा उपस्थित केल्याचा संदर्भ देत ‘इंडिया टुडे’च्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “आम्ही कुठे वेगळा रस्ता निवडलाय? आम्ही तोच मार्ग निवडलाय. शिवसेना-भाजपाची युती होती. आम्ही एकत्र निवडणूक लढलो. आमच्याकडे सध्या शिवसेनेतील दोन तृतीयांशपेक्षा जास्त सहकारी आहेत. आम्ही भाजपासोबत आहोत,” असं शिंदेंनी सांगितलं. “आम्ही एक मजबूत सरकार देत आहोत. (हे सरकार स्थापन करुन) आम्ही कोणतंही चुकीचं पाऊल उचलेलं नाही,” असंही शिंदे म्हणाले.

हे ईडी सरकार…
“काँग्रेसचं म्हणणं आहे की हे ईडीचं म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे,” असं म्हणत पत्रकाराने शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावरुन प्रिक्रिया देताना शिंदेंनी, “यावर मी काही बोलू इच्छित नाही. आमचे ते ५० आमदार वेगळी भूमिका स्वीकारतात. ते सत्तेतून बाहेर जातात. सामान्यपणे कोणी सत्ता सोडू पाहत नाही. पण आम्ही सत्तेतून बाहेर गेलो याचं कारण काय आहे? याचं सर्वांनी आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे,” असा टोला शिंदेंनी लगावला. “आमदारांना अडीच वर्षात जे अनुभव आले ते पाहता त्यांनी एक नवा मार्ग निवडला. प्रत्येकाला आपल्या मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे. मात्र त्यांना ती करता येत नव्हती. सरकारमध्ये असूनही काम करता येत नव्हती म्हणून ते नाराज होतो आणि त्यामुळेच ते बाहेर पडले,” असंही शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button