उद्धव ठाकरेंची महत्त्वाची खेळी, कार्यकारिणी बैठकीत ‘हा’ महत्त्वाचा ठराव एकमताने मंजूर, एकनाथ शिंदे गटावर मात करण्याचा प्रयत्न
शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत एकूण सहा ठराव मंजूर करण्यात आले. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय घेण्याचे तसेच अंमलबजावणीचे पूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत.
Shiv Sena resolution and Balasaheb Thackeray : शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांना घेऊन आसाम राज्यातील गुवाहाटी येथे ठाण मांडून आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे या आमदारांना चर्चेतून तोडगा निघू शकतो असे आवाहन करत परत बोलावत आहेत. दरम्यान, शिवसेनेने आजच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केले असून या ठरावांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे गटावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला नवा गट स्थापन केल्याचे म्हटले जात असताना शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणालाही वापरता येणार नसल्याचा ठराव आजच्या बैठकीत मंजूर करुन घेतला आहे.
ठरवात काय आहे?
शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत एकूण सहा ठराव मंजूर करण्यात आले. या बैठकीत सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्णय घेण्याचे तसेच अंमलबजावणीचे पूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. तसेच ठराव क्रमांक पाचमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव शिवसेना पक्षाव्यतिरिक्त इतर कोणालाही वापरता येणार नाही, असे म्हणण्यात आले आहे. “शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना विलग करता येणार नाही आणि ते कोणी करुही शकत नाही. म्हणूनच शिवसेना पक्षाव्यतिरिक्त बाळासाहेब ठाकरे हे नाव इतर कोणालाही वापरता येणार नाही,” असे या ठरावात म्हणण्यात आले असून तो एकमताने मंजूर करण्यात आला आहे.
याआधी एकनाथ शिंदे तसेच इतर बंडखोर आमदारांनी ‘शिवसेना बाळासाहेब’ असा नवा गट स्थापन केल्याचे वृत्त समोर आले आहे. या गटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या नावाची लवकरच एकनाथ शिंदे गटाकडून घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेनेव्यतिरिक्त कोणालाही वापरता येणार नसल्याचा ठराव मंजूर केल्यामुळे आता शिंदे गट काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी नव्या गटाबाबत अधिक माहिती दिली आहे. “शिवसेना बाळासाहेब असं गटाचं नाव ठेवलं आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आमची बांधिलकी कायम आहे. आम्ही स्वतंत्र गट स्थापन केला आहे. आम्ही कुणामध्येही विलीन होणार नाही. गटाचं अस्तित्व स्वतंत्र असणार आहे. कुणीही पक्षातून बाहेर पडलेलं नाही. विधिमंडळात मात्र आमची भूमिका वेगळी असणार आहे,” असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.